Tata Salt Price: महागाईच्या जखमेवर 'मीठ'! टाटा कंपनी मीठाच्या किमतीत वाढ करणार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:30 PM2022-08-12T15:30:52+5:302022-08-12T15:31:35+5:30
पीठ, मैदा, तेलानंतर आता मीठ महागणार आहे. मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने 'टाटा सॉल्ट'च्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली :
पीठ, मैदा, तेलानंतर आता मीठ महागणार आहे. मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने 'टाटा सॉल्ट'च्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. महागाईमुळे टाटा सॉल्टच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता आणखी एक झटका बसणार आहे.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार मीठावर महागाईचा दबाव वाढत आहे. त्यामुळे भाव वाढवावे लागले आहेत. महागाईत सातत्यानं वाढ होत असल्यानं कंपनीच्या महसुलावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आपले मार्जिन वाचवण्यासाठी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा सॉल्टच्या सर्वात स्वस्त मिठाच्या एका किलोच्या पॅकेटची किंमत २५ रुपये आहे. त्याची किंमत आता २८ ते ३० रुपयांपर्यंत वाढू शकते. दरम्यान किमतीत किती वाढ होणार याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. डिसोझा म्हणाले की, मीठाच्या किमती ठरवताना दोन घटक महत्वाचे ठरतात. यामध्ये ब्राइन आणि इंधनाच्या किमतींचा समावेश आहे. गतवर्षी खर्च वाढल्यानंतर खाऱ्याचे दर जैसे थेच आहेत. मात्र, ऊर्जेची किंमत खूप वाढली आहे. त्यामुळे मिठाच्या मार्जिनवर महागाईचा ताण दिसून येत आहे.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने बुधवारी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. अन्न आणि पेय व्यवसायात कंपनी बाजारपेठेत चांगली कामगिरी करत आहे. टाटा चहाच्या व्यवसायाच्या चांगल्या कामगिरीमुळे मिठाच्या किमती वाढण्याचा दबाव कमी झाला आहे. जून तिमाहीत टाटा ग्राहक उत्पादनांचा नफा वार्षिक 38 टक्क्यांनी वाढून (YoY) २५५ कोटी झाला आहे. याउलट, मागील वर्षी याच कालावधीत ते २४० कोटी रुपये होते.