वास्तुविशारद म्हणून काम करण्याचे राहून गेले; रतन टाटा यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:16 AM2021-07-11T06:16:29+5:302021-07-11T06:18:26+5:30
१९५९ मध्ये रतन टाटा यांनी मिळवली होती वास्तुविशारदाची पदवी. वास्तुविशारद म्हणून काम करण्याचं राहून गेल्याचं सांगत टाटा यांनी व्यक्त केली खंत.
टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे आयुष्यातील एक स्वप्न अधुरेच राहिले आहे. त्यांनी वास्तुविशारदाची (आर्किटेक्ट) पदवी मिळविली होती. मात्र टाटा उद्योगसमूहात व्यग्र झाल्याने वास्तुविशारद म्हणून प्रदीर्घ काळ काम करण्याचे राहून गेले अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातूनरतन टाटा यांनी १९५९ साली वास्तुविशारदाची पदवी मिळविली होती. त्यांना आयुष्यात हाच पेशा स्वीकारण्याची इच्छा होती. मात्र त्यांनी अभियंता व्हावे अशी रतन टाटांच्या वडिलांची इच्छा होती.
दोन वर्षे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कळून चुकले की, वास्तुविशारदाच्या शिक्षणातच आपल्याला अधिक रस आहे. मला वास्तुविशारद म्हणून काम करता आले नाही याची नेहमी खंत वाटते, असे रतन टाटा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
ते म्हणाले की, कॉर्नेल विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर लॉस एंजलिसमध्ये मी दोन वर्षे एका वास्तुविशारदाच्या कार्यालयात नोकरी केली होती. विविध प्रकारची कौशल्ये एका माळेत कशी गुंफायची याचे उत्तम शिक्षण वास्तुविशारदाच्या अभ्यासक्रमातून मिळते.
आपल्याकडे असलेल्या निधीचा विचार करून त्यानुसार एखाद्या प्रकल्पाची उभारणी करण्याचे कसब वास्तुविशारदाला चांगलेच अवगत असते. वास्तुविशारद म्हणून व्यवसाय करणे आपल्याला जमत नाही असे विधान एखादी व्यक्ती स्वत:विषयी करते. पण ते योग्य वक्तव्य नाही असेही रतन टाटा म्हणाले.
कुपोषण समस्या संपली पाहिजे
रतन टाटा म्हणाले की, देशातील बालकांमध्ये असलेली कुपोषणाची मोठी समस्या संपविण्यासाठी एक प्रकल्प राबविण्याची इच्छा होती. ते स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही असेही त्यांनी सांगितले.