टाटा स्टीलच्या ओडिशातील प्लांटमध्ये वाफेची गळती, अनेक कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 06:11 PM2023-06-13T18:11:28+5:302023-06-13T18:11:58+5:30
टाटा स्टीलने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
ओडिशातील मिरामंडली येथील टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. प्लांटमध्ये अचानक वाफेच्या(स्टीम) गळतीमुळे अनेक मजुरांची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही मजूर कटक येथे उपचारासाठी गेले आहेत. या संदर्भात कंपनीने एक निवेदन जारी करून घटनेला दुजोरा दिला आहे.
वाफेच्या गळतीमुळे किती मजूर आजारी पडले आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गरम वाफेमुळे मजूर भाजले गेल्याची शक्यता आहे. टाटा स्टीलने आपल्या निवेदनात म्हटले की, ओडिशातील मिरामंडली येथील टाटा स्टीलच्या BFPP2 पॉवर प्लांटमध्ये वाफेची गळती झाली, यात काही मजूर जखमी झाले. या घटनेबद्दल आम्हाला खेद आहे. जखमी मजूरांना आम्ही रुग्णालयात पाठवले आहे.
Tata Steel Statement on Accident at BFPP2 Power Plant, Tata Steel Meramandali pic.twitter.com/sISjI2Wlaa
— Tata Steel (@TataSteelLtd) June 13, 2023
कंपनीने मजुरांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला
टाटा स्टीलने सांगितल्यानुसार, प्रत्येक जखमी मजूराला कंपनीच्या रुग्णवाहिकेतून कटकला पुढील उपचारासाटी नेण्यात आले आहे. त्याचबरोबर वाफेच्या गळतीमुळे जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना मदत केली जात आहे. कंपनी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.