टाटा VS मिस्त्री लढा सुरूच राहणार
By admin | Published: February 8, 2017 02:14 AM2017-02-08T02:14:00+5:302017-02-08T02:14:00+5:30
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरूनही दूर करण्यात आले
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरूनही दूर करण्यात आले असले तरी मिस्त्री यांचा टाटांच्या विरोधातील कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
टाटा सन्सच्या विशेष सर्वसाधारण सभेत काल मिस्त्री यांना संचालक पदावरून दूर करण्यात आले. एंजल स्टॉक ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे प्रमुख वैभव अग्रवाल यांनी सांगितले की, मिस्त्री यांना संचालकपदावरून दूर करून टाटा उद्योग समूहाने याबाबतची अनिश्चितता संपविली आहे.
आता कंपनी केवळ व्यवसायाकडे लक्ष देऊ शकेल. मात्र दोन्ही बाजूंचा कायदेशीर लढा सुरूच राहील असे दिसते. टीसीएसचे सीईओ एन. चंद्रशेखरन यांची याआधीच टाटा सन्सच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ते २१ फेब्रुवारी कार्यभार स्वीकारणार आहेत. याशिवाय कंपनीने संचालकपदाची जागा रिक्त ठेवलेली नाही.
आपला लढा कायदेशीर व्यासपीठावर घेऊन जात आहोत, असे मिस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले होते. गुंतवणूक सल्लागार एस. पी. तुलसीयन यांनी सांगितले की, ही लढाई दीर्घकाळ चालेल. हा खटला कंपनी लवादातून उच्च न्यायालयात व तेथून सर्वोच्च न्यायालयात जाईल.
टाटा सन्सची विशेष सर्वसाधारण सभा रोखण्यासाठी सायरस मिस्त्री यांच्या गुंतवणूक संस्थांनी राष्ट्रीय कंपनी लवादासमोर याचिका दाखल केल्या होत्या. त्या लवादाने शुक्रवारी
फेटाळून लावल्या होत्या. टाटांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी लवादासमोर सांगितले होते की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा होऊ द्यावी. संचालकाची एक जागा ३0 दिवसांपर्यंत रिक्त ठेवली जाईल.
मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हाकलल्यानंतर शापूरजी पालनजी कुटुंबाचा कोणीही प्रतिनिधी टाटाच्या संचालक मंडळात नाही. कित्येक दशकांत पहिल्यांदाच असे घडत आहे. मिस्त्री यांचे वडील पालनजी शापूरजी मिस्त्री हे १९८0 ते २00४ या काळात संचालक मंडळावर होते. सायरस मिस्त्री २00६मध्ये संचालक मंडळावर आले. टाटामध्ये मिस्त्री यांच्या कुटुंबाची १९६५पासून मोठी हिस्सेदारी आहे.