सायरस मिस्त्रींचे आरोप टाटांनी फेटाळले
By admin | Published: October 28, 2016 04:59 AM2016-10-28T04:59:26+5:302016-10-28T04:59:26+5:30
टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा
नवी दिल्ली : टाटा सन्सचे पदच्यूत चेअरमन सायरस मिस्त्री यांनी केलेले आरोप रतन टाटा यांच्या वतीने फेटाळून लावण्यात आले आहेत. टाटा यांचा मागच्या दाराने समूहाचा ताबा मिळविण्याचा कोणताही हेतू नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालय हा वाद सोडविण्याचे अंतिम स्थान आहे, असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले.
टाटा समूहातर्फे अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, मी वादविवादात पडू इच्छित नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळत असते, हे आपल्याला न्यूटनने शिकविले आहे. कोणीही आरोपांची राळ उडवू नये. शहाणपणाचे दर्शन घडविणे ही काळाची गरज आहे. शहाणपण हरवते आणि त्याची जागा आक्रमकता घेते, तेव्हा दुर्दैवाने न्यायालये हाच पर्याय उरतो.
टाटा यांना चेअरमनपद सोडण्याचे कोणतेही बंधन नव्हते. तरीही त्यांनी स्वत:च ते सोडले. मानद चेअरमन म्हणून हक्क असतानाही संचालक मंडळांच्या एकाही बैठकीला हजर नव्हते. आता त्यांनी पद स्वीकारले असले तरी ते हंगामी आहे. मागच्या दाराने उद्योग समूहाची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवालही सिंघवी यांनी केला. सायरस मिस्त्री यांना पदच्यूत करण्याच्या निर्णयाचे सिंघवी यांनी समर्थन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
त्यांनी समूहाची प्रतिमा मलीन केली
आपल्याला अधिकारच नव्हते, हा मिस्त्री यांचा दावा टाटा सन्सने निवेदनाद्वारे फेटाळला आहे. त्यात म्हटले की, कार्यकारी चेअरमन या नात्याने मिस्त्री यांना सर्व अधिकार होते. अधिकार नसल्याचा आरोप त्यांनी पदावरून हटविल्यानंतरच केला.
माजी चेअरमननी (रतन टाटा) दशकभराच्या काळात घेतलेल्या निर्णयांवरही पदावरून गेल्यानंतरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. हा प्रकार दुर्दैवी आहे. मिस्त्री यांनी समूहाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार माफीयोग्य नाही.
अॅड. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, जेव्हा नऊ शहाणे-सुरते स्त्री-पुरुष एका व्यक्तीबाबत अविश्वास व्यक्त करतात, तेव्हा त्यामागे काही तरी कारणमीमांसा असते, हे लक्षात घेतले पाहिजे.