‘तत्त्वशून्य’ ‘गोपूमामा’चा भाच्याने केला धिक्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:13 AM2017-07-31T02:13:51+5:302017-07-31T02:13:51+5:30
आयुष्यभर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांशी बांधिलकी सांगणा-या गोपाळकृष्ण गांधी यांनी घराणेशाहीचे राजकारण रुजविणा-या काँग्रेसतर्फे
नवी दिल्ली : आयुष्यभर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांशी बांधिलकी सांगणा-या गोपाळकृष्ण गांधी यांनी घराणेशाहीचे राजकारण रुजविणा-या काँग्रेसतर्फे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची उमेदवारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे भाचे श्रीकृष्ण (क्रिश) कुलकर्णी यांनी आपल्या ‘गोपूमामा’चा जाहीर धिक्कार केला आहे.
गोपाळकृष्ण गांधी यांना उद्देशून इंग्रजीत लिहिलेले खुले पत्र कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकले आहे. या पदासाठी उमेदवारी मिळाल्याने एकीकडे आनंद झाला, पण दुसरीकडे तत्त्वनिष्ठ ‘गोपूमामा’ने घेतलेल्या या निर्णयाने मन पार हताश झाले, असे नमूद करून, ‘एक सामान्य नागरिक’ या नात्याने कुलकर्णी यांनी भावना पत्रात मांडल्या आहेत.
‘गोपूमामा’ला उद्देशून भाचा लिहितो, आपण दोघेही ज्यांचे रक्ताचे वारस आहोत, ते महात्मा गांधी व डॉ. भीमराव आंबेडकर हे निर्भीड आणि निरलस नेते होते. कोणालाही जन्माने कोणताही हक्क मिळण्यास या दोघांचा ठाम विरोध होता.
‘गोपूमामा तू आयुष्यभर या दोघांच्या तत्त्वज्ञानाशी बांधिलकी सांगितलीस. त्यामुळे या तत्त्वांशी कोणतेही सोयरसुतक नसलेल्या काँग्रेसतर्फे तू उमेदवारी स्वीकारावीस, याने मन विदीर्ण झाले. घराणेबाज काँग्रेस नेत्यांसोबत बसून उमेदवारी अर्ज दाखल करतानाची तुझी छायाचित्रे टीव्हीवर पाहून खंत वाटली. मामा. त्या एका कृतीने तू आयुष्यभर निष्ठने पाळलेल्या तत्त्वांची पार चिरफाड केलीस!’