Tauktae Cyclone: तौक्तेचे २६ बळी, ४९ बेपत्ता तर १८६ जणांची सुखरूप सुटका; अद्यापही शोधमोहिम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:29 AM2021-05-20T06:29:57+5:302021-05-20T06:30:29+5:30
तटरक्षक दलाच्या जवानांचे शाेध व बचावकार्य नेटाने सुरू
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे उधाणलेल्या समुद्राच्या तडाख्यात सापडून भरकटलेल्या ५ नौकांपैकी पी-३०५ या बार्जवरील २६ जणांचे मृतदेह बुधवारी तटरक्षक दल पथकाच्या हाती लागले. उर्वरित ४९ जणांचा शोध अद्याप सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत या बार्जवरील १८६ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. दोन दिवसांत पाच बार्जवरील ६२२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
प्रचंड वेगाने वाहणारे वारे, २० ते २५ फूट उंचीच्या लाटा आणि खराब हवामानामुळे शून्यावर आलेली दृश्यमानता अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय नौदल, तटरक्षक दलाच्या जवानांनी अरबी समुद्रातील मुंबई हाय परिसरात शोध आणि बचावकार्य नेटाने सुरू ठेवले. बेपत्ता कर्मचाऱ्यांबाबत आम्ही अद्याप आशा सोडली नाही. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतशी कर्मचाऱ्यांची वाचण्याची शक्यता कमी होते, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने पी-३०५ या बार्जवरील (कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय असणारी मोठी तराफा) २७३ जणांचा जीव धोक्यात आला होता. याशिवाय, गॅल कन्स्ट्रक्टरवर १३७, ‘सागरभूषण’वर १०१, तर एस. एस. -३ वर १९६ जण अडकून पडले होते. दोन दिवसांपासून नौदल आणि तटरक्षक दलाकडून ओएनजीसीसह शोध आणि बचावकार्य सुरू आहे. पी-३०५ वगळता अन्य ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात यंत्रणांना यश आले आहे. आपत्तीग्रस्त पी-३०५ मधून सुखरूप बाहेर पडलेल्या १८६ कर्मचाऱ्यांसह आयएनएस कोची ही युद्धनौका आज नौदल गोदीत दाखल झाली. तर, तब्बल २६ जणांचे मृतदेह बचाव पथकांच्या हाती लागले आहेत. अद्याप ४९ जणा बेपत्ता असल्याची माहिती असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नौदलाच्या जनसंपर्क विभागाने दिली.
भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस कोलकत्ता, आयएनएस तलवार या युद्धनौकांसह बेतवा, तेग, बिआस ही जहाजे पी-८१ विमानासह सी-किंग हेलिकाॅप्टर्स या बचावकार्यात गुंतली आहेत. याशिवाय, तटरक्षक दलाच्या सम्राट, अन्य जहाजे आणि चेतक हेलिकाॅप्टर्ससह खासगी संस्थांकडून मदतकार्यासाठी लागणारी टोईंग आणि अन्य जहाजे या कामात वापरण्यात येत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये धडकणार ‘यास’
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळ शमले नसतानाही उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचे बंगालच्या उपसागरात पुढील ७२ तासांत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह लगतच्या आसाम, मेघालय भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. या वेळी वार्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी असण्याची शक्यता आहे.
चाैकशीसाठी समिती स्थापन
वादळाच्या धोक्याची पूर्वसूचना असतानाही इतक्या संख्येने कर्मचारी समुद्रातच राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याच्या चौकशीसाठी शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीत संरक्षण विभागासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये ४५ मृत्यू
तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुजरातच्या १२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चक्रीवादळाने प्रभावित भागाची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील त्यांच्यासोबत होते. ‘तौक्ते’ चक्रीवादळ सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सौराष्ट्रमधील अमरेली, तसेच इतर काही जिल्ह्यांना बसला आहे. अमरेलीमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
चक्रीवादळामुळे कच्छ भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. चक्रीवादळ कमकुवत झाले तरी गुरुवारपर्यंत त्याचा पूर्ण प्रभाव ओसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ एका तीव्र वादळात परिवर्तित झाले असून, ते राजस्थानच्या दिशेने सरकत
आहे. त्यामुळे राजस्थान, तसेच मध्य प्रदेशातील काही भागांत मुसळधार पावसाने थैमान घातले.
गुजरातला १ हजार कोटींची मदत
पंतप्रधान मोदी यांनी गुजरात, दमण व दीव भागाची हवाई पाहणी केली. त्यानंतर एकूण नुकसानीबाबत त्यांनी अहमदाबाद येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या गुजरातला पंतप्रधानांनी १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाइकांना केंद्र सरकारने २ लाख रुपये, तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.