कर कपातीमुळे पामतेल होणार आणखी स्वस्त; केंद्राचा सर्वसामान्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:16 AM2021-07-01T08:16:57+5:302021-07-01T08:17:44+5:30
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गगनाला भिडलेले खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अखेर पावले उचलली असून कच्च्या पाम तेलावरील बेसिक सीमा शुल्कात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. कच्च्या पाम तेलावर आता १० टक्के बेसिक सीमा शुल्क लावले जाईल. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होत असून तो ३० सप्टेंबरपर्यंत लागू असेल.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरात वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. एकीकडे कोरोनाने कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (सीबीआयसी) मंगळवारी रात्री एक अधिसूचना काढली. कच्च्या पाम तेलावरील बेसिक कस्टम ड्युटी १० टक्के करण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.