'सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टॅक्स', खासदार राघव चड्ढांनी संसदेत ऐकवली Tax कविता...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:22 PM2024-08-08T21:22:37+5:302024-08-08T21:23:06+5:30
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी देशातील टॅक्सचा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत केंद्र सरकारच्या करप्रणालीवर सडकून टीका केली. यावेळी राघव यांनी देशातील टॅक्स सिस्टीमवर कविताही केली. "सकाळी उठल्यावर टॅक्स, रात्री झोपेपर्यंत टॅक्स, रडण्यावर टॅक्स, पुस्तकांवर टॅक्स शाईवर टॅक्स, भाजीपाल्यावर टॅक्स, वाहनांवर टॅक्स घरावर टॅक्स...टॅक्स हे सरकारचे एकमुखी ध्येय बनले आहे," अशी टीका राघव चड्ढा यांनी केली.
I recited a poem in Parliament on the Indian Tax System
— Raghav Chadha (@raghav_chadha) August 8, 2024
संसद में मैंने देश के टैक्स सिस्टम पर एक कविता सुनाई
आप भी सुनिए.. pic.twitter.com/FkDtldiGAr
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा पुढे म्हणाले, "अर्थमंत्र्यांना महागाईचा प्रभाव दिसत नाही का? त्या असे निर्णय का घेत आहेत? सरकारने प्रत्येक मालमत्तेवर इंडेक्सेशन लागू केले पाहिजे. भारतीय गुंतवणूकदाराकडून इंडेक्सेशन हिसकावून घेणे, म्हणजे त्याचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. केंद्र सरकारने अपूर्ण पद्धतीने इंडेक्सेशन लागू केले आहे," असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी राघव चढ्ढा यांनी सभागृहात श्री नानकाना साहिबचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अनेक गुरुद्वारा आहेत. यापैकी एका पवित्र स्थानावर श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म झाला होता. त्या ठिकाणाचे नाव नानकाना साहिब आहे. 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, तेव्हा पंजाब प्रांताचीही फाळणी झाली. स्वातंत्र्याच्या वेळी पंजाबमधील अनेक गुरुद्वारा पाकिस्तानात गेले. त्या गुरुद्वारांमध्ये भाविकांना सहज दर्शन घेता यावे, यासाठी सरकारने काम केले पाहिजे. ज्याप्रकारे कर्तारपूर कॉरिडॉर बांधला गेला, त्याप्रकारे ननकाना साहिबचे दर्शन घेण्याची संधीही मिळावी.