कर भरून जाहीर करा दडविलेली मालमत्ता !
By admin | Published: March 1, 2016 03:54 AM2016-03-01T03:54:47+5:302016-03-01T03:54:47+5:30
ज्या लोकांनी आजवर त्यांची संपत्ती, मालमत्ता अथवा रोखीच्या रूपाने असलेला पैसा जाहीर केलेला नाही, अशा लोकांसाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी
नवी दिल्ली : ज्या लोकांनी आजवर त्यांची संपत्ती, मालमत्ता अथवा रोखीच्या रूपाने असलेला पैसा जाहीर केलेला नाही, अशा लोकांसाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एका नव्या अभय योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत संबंधित व्यक्तीला त्याच्या दडविलेल्या संपत्तीवर ४५ टक्के कर भरून ती मालमत्ता नियमित करून घेता येईल. १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या चार महिन्यांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आपली संपत्ती जाहीर करणाऱ्या लोकांना दोन महिन्यांच्या आत कराची रक्कम भरून या योजनेअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
या अंतर्गत ३० टक्के कर, त्यावर ७.५ टक्के अधिभार आणि त्यावरच साडे सात टक्के दंड अशी एकूण ४५ टक्के दराने आकारणी होणार आहे. यापैकी साडे सात टक्क्यांचा अधिभार हा ‘कृषी कल्याण अधिभार’ म्हणून घेतला जाणार असून, हा महसूल कृषी आणि ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यास वापरण्यात येणार आहे. काळापैसा बाहेर काढण्यास सरकार कटिबद्ध असून, त्याकरिता ही योजना लागू केल्याचे जेटली म्हणाले.200%
जर एखाद्या करदात्याने करचोरी किंवा करविषयक खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या दंडात आता घसघशीत वाढ झाली आहे. करचोरी करणाऱ्या व्यक्तीस ५० टक्के दंड तर कराची माहिती दडविणाऱ्या किंवा खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीवर तब्बल २०० टक्के दंड आकारण्यात येणार आहे. विविध भागातील कर अपिलीय प्राधिकरणामध्ये ३ लाख याचिका प्रलंबित असून, यामध्ये साडे पाच लाख कोटींचा निधी अडकला आहे. ज्यांचे अपील प्रलंबित आहे, अशा करदात्यांना वादात अडकलेली कराची रक्कम व सुनावणीच्या दिवसापर्यंत त्या रकमेवरील कर भरून तडजोडीने ती केस मिटविता येईल.