नोटमंदी: साठेबाजांवर छापे, रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:30 AM2018-04-19T09:30:57+5:302018-04-19T09:30:57+5:30

आंध्र प्रदेश, तेलंगणामधील मोठे कंत्राटदार रडारवर

taxmen raids on cash hoarders and rbi increase notes supply | नोटमंदी: साठेबाजांवर छापे, रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला

नोटमंदी: साठेबाजांवर छापे, रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला

Next

नवी दिल्ली: देशात निर्माण झालेली चलन टंचाई दूर करण्यासाठी आता अनेक आघाड्यांवर प्रयत्न सुरु झाले आहेत. एकीकडे कर यंत्रणांनी रोख रकमेचा साठा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनं रोख रकमेचा पुरवठा वाढवला आहे. बुधवारी कर्नाटक, आंध्र प्रदेशात 30 ते 35 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर बिहारमधील एटीएम नेटवर्कच्या माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील रोकड टंचाईची समस्या मोठी आहे. याठिकाणी मोठ्या कंत्राटदारांची भूमिका संशयास्पद असल्यानं कर यंत्रणांकडून अनेकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.  

छापेमारीतून आतापर्यंत मोठी रोख रक्कम हाती लागलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये कर यंत्रणांकडून कारवाईला व्यापक रुप देण्यात येणार आहे. देशाच्या अनेक भागांमधील चलन टंचाईमागे दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी हे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड काढणारे आता यंत्रणांच्या रडारवर असणार आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील कंत्राटदारांचे व्यवहारदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळेच या व्यवहारांचा तपासदेखील संबंधित यंत्रणांकडून केला जाणार आहे. या दोन्ही राज्यांमधील अनेक मोठे कंत्राटदार लहान कंत्राटदारांना धनादेश देत आहेत. प्रकल्पांच्या नावाखाली हे धनादेश दिले जात असून त्याच्या आधारे लहान कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली जात आहे. 

विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी कोणतीही कामं झाली नसताना धनादेश दिले जात आहेत. 'काही व्यवहारांमध्ये खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे जितकी रक्कम कंत्राटदारांनी बँकेतून काढली आहे, तितक्या रकमेची कामं झालेली नाहीत. अनेक योजनांतर्गत येणारी कामं झालेली नाहीत. मात्र त्यांचा खर्च दाखवण्यात आला आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भागातील रोख रकमेच्या साठ्याशी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आगामी निवडणुकांशी संबंध आहे का, याचाही तपास सध्या सुरू आहे. 
 

Web Title: taxmen raids on cash hoarders and rbi increase notes supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.