टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 08:22 PM2024-06-16T20:22:25+5:302024-06-16T20:22:50+5:30
आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय.
केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारने आपले काम सुरु केले आहे. दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आपल्याकडेच कशी ठेवता येईल यासाठी भाजपा रणनिती आखण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. याला जेपी नड्डा, आश्विनी वैष्णव, किरन रिजिजू, लल्लन सिंह, चिराग पासवान आदी हजर होते.
18व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक झाली. बैठकीत सभापती आणि उपसभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवारासह विरोधी पक्षातील घटक पक्षांना आपल्याबाजुने करण्यासाठी कशी रणनिती आखता येईल यावर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपासाठीलोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेवणे खूप महत्वाचे आहे. एनडीएसाठी हे पद जिंकणे कमी जिकीरीचे नाहीय. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाहीय.
24 जूनपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होऊ शकते. 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. संसदेचे 8 दिवसांचे विशेष अधिवेशन 24 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असल्याचे समजते आहे. 24 आणि 25 जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो.
तसेच गेल्या पाच वर्षांपासून उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच सभागृहात विरोधी पक्षनेता नव्हता. तो यावेळी इंडिया आघाडीला मिळणार आहे. उपाध्यक्ष पद रिकामे ठेवू नये म्हणून विरोधी पक्ष दबाव टाकू लागला आहे. उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याचा प्रघात आहे. परंतू, गेल्या सरकारमध्ये त्यांना देण्यात आले नव्हते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने सभापतीपदासाठी एनडीएला पाठिंबा देण्याचे उघडपणे मान्य केले आहे. परंतू टीडीपीने आपले पत्ते खोललेले नाहीत. यामुळे भाजप टेंशनमध्ये आहे.
भाजपाच्या इतिहासातच उत्तर...
लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाला का महत्वाचे आहे याचे उत्तर या पक्षाच्या इतिहासात लपलेले आहे. १९९८ मध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आले होते. परंतू काही महिन्यांतच ते अल्पमतातही आले होते. तेव्हाही टीडीपी एनडीएत होता. वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात टीडीपीने अध्यक्षपद मागितले होते. परंतू, भाजपाने ते न दिल्याने बाजी पालटली होती. तीन भीती आता भाजपाला आहे तर विरोधकांना आशेचा किरण दाखवत आहे.