'चहालासुद्धा 20 रुपये लागतात, म्हणून निराधारांना महिना 2 हजारांची मदत द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 05:02 PM2019-06-25T17:02:19+5:302019-06-25T17:23:32+5:30
राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीच्या खासदारही पती रवी राणा यांच्याप्रमाणेच आक्रमक झाल्याचे संसदेत पाहायला मिळाले.
नवी दिल्ली - देशातील निराधारांना श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत केवळ 200 रुपये महिना केंद्र सरकारकडून देण्यात येतो. तर राज्य सरकारकडूनही केवळ 400 रुपये भत्ता मिळतो. मात्र, सद्यपरिस्थिती पाहाता, देशातील वाढती महागाई लक्षात घेता. सहाशे रुपये महिन्यात या निराधार, गरजू-गरिबांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा?. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत विचार करुन निराधार, गरिब, बेरोजगार, अंध-अपंग यांना केंद्र सरकारतर्फे किमान 2 हजार रुपयांचा मदत भत्ता द्यावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार राणा नवनीत कौर यांनी लोकसभेत केली.
राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावतीच्या खासदारही पती रवी राणा यांच्याप्रमाणेच आक्रमक झाल्याचे संसदेत पाहायला मिळाले. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही गरीबांसाठी घरकुल योजनेचा लाभ मिळायला हवा. महाराष्ट्राला केवळ 7 लाख घरकुल योजनेचं लक्ष्य देण्यात आलं आहे. पण, योजना ही 20 ते 25 लाख घरकुलाची मंजूर करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच, देशातील निराधारांना सरकारकडून मदत भत्ता म्हणून केवळ 200 रुपये देण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तसेच राज्य सरकारचे 400 आणि केंद्राचे 200 असे मिळून केवळ 600 रुपये भत्ता 65 वर्ष वयावरील निराधारांना सरकारकडून मिळतो. मात्र, आजमित्तीला आपण चहा प्यायला गेलो तरी, 20 रुपये लागतात. मग, या निराधारांना 600 रुपयांत महिना कसा घालवायचा? असा प्रश्न नवनीत यांनी उपस्थित केला. तसेच, निराधार, अंध-अपंग, बेरोजगारांना केंद्र सरकारने किमान 2 हजार रुपये महिना भत्ता द्यावा, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली. पंतप्रधान हे देशाचे आहेत, ते कोण्या एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही नवनीत यांनी म्हटले.