मद्यनिर्मितीऐवजी केवळ चहा उत्पादन
By admin | Published: May 19, 2016 04:33 AM2016-05-19T04:33:36+5:302016-05-19T04:33:36+5:30
मेघालयातील एका गावाने स्वत:मध्ये ऐतिहासिक बदल घडवत, आता ‘आदर्श’ गाव म्हणून लौकिक मिळविला आहे.
शिलाँग : एके काळी मद्यनिर्मितीसाठी आणि मद्यपींसाठी कुख्यात असलेल्या मेघालयातील एका गावाने स्वत:मध्ये ऐतिहासिक बदल घडवत,
आता ‘आदर्श’ गाव म्हणून लौकिक मिळविला आहे. या गावाने मद्यनिर्मिती पूर्णपणे थांबवली असून, आता तेथे केवळ चहा उत्पादन केले जाते.
मायलनगॉट असे या गावाचे नाव असून, ते राजधानी शिलाँगपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात हा ऐतिहासिक बदल घडविण्यामागे एक माजी शिक्षक आणि आताचा ग्रामप्रधान डी. एल. नाँगस्पंग यांचे डोके आहे. या गावातील २0 शेतकऱ्यांनी चहा उत्पादकांची एक सोसायटी स्थापन केली. त्यातील सहकार चळवळ राबवून गावाचे रूपांतर ‘आदर्श’ गावात केले. हे सर्व जण ५0 हेक्टर जमिनीवर दरवर्षी सेंद्रिय चहापत्तीचे वर्षाला ३ हजार किलोग्रॅम इतके उत्पन्न काढतात. आता तर ते गेल्या दोन वर्षांपासून आॅस्ट्रेलियाला चहाची
निर्यात करीत आहेत.
दहा १0 वर्षांपूर्वी हे गाव मद्यनिर्मिती आणि मद्यपींसाठी कुख्यात होते. स्थानिक महिला विशिष्ट प्रकारची ‘पायरसी’ नावाची दारू तयार करीत असत. आता त्याच महिला वेगवेगळ्या स्वादाच्या चहाचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी त्याला ‘डरलाँग’ असे नाव दिले आहे. स्थानिक भाषेत ‘डरलाँग’चा अर्थ आहे ‘स्वप्न सत्यात उतरले.’ ४६ वर्षीय मोर्ताबान उमेसाँग ही महिला त्यापैकी एक आहे. उमेसाँग म्हणाल्या की, ‘मद्यपी रस्त्यावर गोंधळ घालत फिरत असताना आम्ही तरुण असताना मद्यपींची प्रचंड भीती वाटायची.’
गुन्हे कमी झाले
चहाच्या उत्पादनाला प्रारंभी आदिवासी विकास मंत्रालयाने अर्थसाह्य केले. २00३ साली चहाची रोपे लावण्यात आली. त्यानंतर, चार वर्षांनी चहा उत्पादन सुरू झाले. नंतर येथे चहाच्या पानांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ या संस्थेचे साह्य मिळाले.
या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गावाचे रूपांतर मद्यउत्पादक ते चहा उत्पादक असे झाले असून,
हा फारच महत्त्वाचा बदल आहे. मद्यामुळे कुटुंबात आणि गावात होणारी भांडणे, तसेच अन्य गुन्हे यांच्या प्रमाणात
या काही वर्षात मोठी घट झाली आहे.