दिल्लीच्या रामलीलामध्ये चहा, कॉफी कुल्हडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:36 AM2019-09-15T04:36:36+5:302019-09-15T04:36:45+5:30
दिल्लीच्या रामलीलामध्ये आता एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीलामध्ये आता एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. येथे आता केळीची पाने व मातीचे कुल्हड यांचा वापर केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबवण्याचे सूतोवाच केले होते. याच लाल किल्ल्याच्या प्रांगणात नव श्री धार्मिक रामलीला व्यवस्थापनाने म्हटले आहे की, रामलीलाच्या आयोजनात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दिल्लीच्या सर्वांत मोठ्या रामलीला समितीच्या या निर्णयात अन्य रामलीला समितींचाही समावेश आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व खा. विजय गोयल यांनी रामलीला समितीची एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्लास्टिकच्या वापराने पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीबाबत माहिती दिली होती व याचा वापर थांबवण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर प्लास्टिकरूपी राक्षस संपवण्यासाठी लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जाईल. अन्य रामलीला समित्यांनीही याकामी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
>कागदाची पाकिटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल युज प्लास्टिकवर बंदीचे आवाहन केल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीच्या रामलीलामध्ये प्लास्टिकवर यंदा बंदी असून, सिंगल युज प्लास्टिकचा वापर होणाºया पॉलिथीनच्या जागी पर्यावरणपूरक कागदाची पाकिटे वापरण्यात येणार
आहेत.
>पानांचे द्रोण, कागदाचे ग्लास
श्री आदर्श धार्मिक रामलीला समितीचे प्रचारमंत्री प्रवीण कुमार म्हणाले की, केंद्राच्या सिंगल युज प्लास्टिकवर प्रतिबंध लावण्याच्या मोहिमेत दिल्लीच्या रामलीला समित्या सहभागी होणार आहेत. रामलीलाच्या काळात यावेळी प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, थर्माकोलच्या प्लेट यावर बंदी असेल. याजागी पानांचे द्रोण, कागदाचे ग्लास किंवा कुल्हडचा वापर केला जाणार आहे.