अन्नपदार्थाच्या दर्जावर भाष्य करणाऱ्या तेजबहादूर यांच्या व्हिडीओचा इसिसकडून गैरवापर- बीएसएफ प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 08:26 AM2017-08-28T08:26:55+5:302017-08-28T08:30:14+5:30
नवी दिल्ली, दि. 28- बीएसएफचे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांनी जानेवारी महिन्यात जवानांना मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या खराब दर्जाबद्दल भाष्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेजबहादूर यांच्या या व्हिडीओवर सर्वस्तरावर चर्चाही झाली. पण आता तेजबहादूर यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडीओवर बीएसएफने स्पष्टीकरण दिलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरवलं जाणारं अन्न चांगल्या दर्जाचे असून कोणीही याबद्दलची पडताळणी करावी, असं सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के. के. शर्मा यांनी म्हटलं आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने त्या व्हिडीओचा चुकीचा वापर केल्याचंही के.के शर्मा यांनी म्हटलं आहे. बीएसएफच्या जवानांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी इसिसने त्या व्हिडीओचा वापर केला, असंही त्यांनी म्हटलं. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘मी २००२ मध्ये बीएसएफमध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून रूजू झालो. मात्र तेव्हापासून एकाही जवानाने अन्नपदार्थाच्या दर्जाबद्दल तक्रार केलेली नाही. बदली किंवा पोस्टिंग यांच्याबद्दल काही समस्या असू शकतात. त्यामुळेच जेव्हा तेजबहादूर यादव यांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबद्दल तक्रार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला, तेव्हा मला धक्का बसला,’ असं बीएसएफ प्रमुख शर्मा म्हणाले. ‘बीएसएफच्या जवानांना अतिशय सकस आकार दिला जातो. याशिवाय खाद्यपदार्थांचा दर्जा नियमित तपासला जातो. त्यामुळे जेवणाबद्दल अजून कोणीही तक्रार केलेली नाही,’ असं शर्मा म्हणाले आहेत.
कोणीही कधीही सीमेवरील आमच्या कोणत्याही चौकीवर जाऊन बीसीएफ जवानांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासावा, असं खुलं आव्हान के.के शर्मा यांनी दिलं. ‘तुम्ही कधीही कोणत्याही चौकीवर गेलात, तरीही जवानांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळत असल्याचे तुम्हाला दिसेल. बीएसएफच्या जवानांना सकस आहार पुरेशा प्रमाणात दिला जातो,’ असंही त्यांनी सांगितलं.
तेजबहादूर यादव यांनी बीसीएफ जवानांना मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. सीमेवरील जवानांना अतिशय निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचं यामध्ये त्यांनी म्हटलं होतं. यानंतर तेजबहादूर यादव यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं. तेजबहादूर यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओचा इसिसकडून गैरवापर करण्यात आल्याचं बीएसएफच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.