43 वर्षाच्या शिक्षकाचा आठवीच्या विद्यार्थिनीला प्रपोज, अटकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 01:09 PM2018-02-21T13:09:47+5:302018-02-21T13:11:37+5:30
तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यातील एका सरकरी शाळेमधील 43 वर्षीय शिक्षकाला आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीला प्रपोज केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे
विल्लुपूरम - तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यातील एका सरकरी शाळेमधील 43 वर्षीय शिक्षकाला आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीला प्रपोज केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना व्हॅलेंटाइन्स डे म्हणजेच 14 फेब्रुवारीला घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केला होता.
शिक्षकाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तरुणीवर पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शारिरीक शिक्षण देणा-या शिक्षकालाही अटक केली आहे. आरोपींची ओळख एम निर्मल प्रेमकुमार आणि त्यांचा साशीदार एस लॉरेन्स अशी झाली आहे. दोघेही विवाहित असून त्यांना मुलं आहेत.
जिल्हा शिक्षण अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'निर्मल प्रेमकुमार याने आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीला गुलाब देऊन वर्गात सर्व विद्यार्थ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देत प्रपोज केला होता. विद्यार्थिनीने गुलाब स्विकारण्यास नकार देत प्रस्ताव नाकारला होता. यानंतर निर्मल प्रेमकुमारने जबरदस्ती तिला गुलाब देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर तिने आरोपी शिक्षक निर्मल प्रेमकुमारसोबत बोलणं बंद केलं होतं'.
यानंतर निर्मल प्रेमकुमारने आपल्या सहकारी शिक्षकाला विद्यार्थिनीशी चर्चा करण्यासाठी सांगितलं. यानंतर लॉरेन्सने विद्यार्थिनीवर प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर लॉरेन्सने तिला प्रस्ताव स्विकारला नाही आणि हे सगळं दुस-या कोणाला सांगितलं तर पुढचं शिक्षण होऊ देणार नाही अशी धमकी दिली.
विद्यार्थिनी आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिने प्रस्ताव नाकारत बोलणं बंद केलं. तिच्या पालकांना यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शाळेसमोर निदर्शन करत अटकेची मागणी केली. त्यांनी पोलिसांसोबत जिल्हा शिक्षण अधिका-यांकडे तक्रार दाखल केली. शिक्षण विभागाने प्रकरणाचा तपास करत दोन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.