न्यूड व्हिडिओची धमकी देऊन शिक्षकानेच विद्यार्थ्याच्या आईला केले ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 03:54 PM2018-02-16T15:54:55+5:302018-02-16T15:58:56+5:30
न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणा-या टयुशन टीचरविरोधात विवाहित महिलेने एफआयआर दाखल केला आहे.
अहमदाबाद - न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणा-या टयुशन टीचरविरोधात अहमदाबादमध्ये राहणा-या एका महिलेने एफआयआर दाखल केला आहे. कमलेश पटेल असे या शिक्षकाचे नाव आहे. मागच्या दहा महिन्यांपासून तो या महिलेला ब्लॅकमेल करत होता. कमलेश पटेल एकेदिवशी माझ्या घराच्या बाथरुममध्ये घुसला व त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने माझा न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
कमलेश आणि त्याची पत्नी किंतु मला ब्लॅकमेल करत होते. त्यांनी या व्हिडिओची धमकी देऊन माझ्याकडून आतापर्यंत पाच लाख रुपये वसूल केले आहेत असे या तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. तक्रारदार महिलेला दहावर्षांचा मुलगा असून तिने कमलेश पटेलकडे मुलाला शिकवणी लावली होती. महिलेचा पती मागच्या दहावर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरीला असून वर्षातून एकदा तो भारतात येतो.
आधी तक्रारदार महिलेचा मुलगा कमलेशच्या घरी क्लासला जायचा पण नंतर कमलेशच टयुशन घेण्यासाठी महिलेच्या घरी येऊ लागला.
कमलेशसोबत त्याची पत्नीही या महिलेच्या घरी यायची. त्यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले. ते सर्व एकत्र मिळून फिरायलाही बाहेर जायचे असे तपास अधिका-याने सांगितले. मे 2017 मध्ये महिलेचा पती सौदी अरेबियाला निघून गेल्यानंतर कमलेश एकदिवस तिच्या घरी गेला. त्यावेळी ती घरात एकटी होती. त्यावेळी संधी साधून त्याने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. पण आपण तो प्रस्ताव धुडकावून लावला असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
अलीकडे पुन्हा कमलेश या महिलेच्या घरात घुसला व जबरदस्तीने तिला खेचून बाथरुममध्ये घेऊन गेला. त्यावेळी त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे त्याने लगेच तिथून पळ काढला असे महिलेने सांगितले. दुस-या दिवशी पटेल पुन्हा या महिलेच्या घरी आला व त्याने शूट केलेला व्हिडिओ दाखवला आणि महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. पती सौदी अरेबियाहून परत येईपर्यंत कमलेशने आपल्याकडून पाच लाख रुपये उकळले असे या महिलेने सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात नवरा परतल्यानंतर तिने सर्व घडला प्रकार त्याला सांगितला. त्यांनी तडजोडीने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पण बोलणी फिस्कटल्यानंतर त्यांनी कमलेश आणि त्याची पत्नी किंतु विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या कमलेश आणि त्याची पत्नी फरार आहेत.