शाळेतून काढून टाकल्याच्या रागातून विद्यार्थ्यांनी भरवर्गात केली शिक्षकाची हत्या
By admin | Published: September 27, 2016 10:59 AM2016-09-27T10:59:18+5:302016-09-27T11:37:07+5:30
शाळेतून काढून टाकल्याच्या रागातून बारावीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु असतानाच शिक्षकाला भोसकले आणि हत्या केली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - विद्यार्थ्यांनीच भरवर्गात शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु असतानाच शिक्षकाला भोसकले आणि हत्या केली. मुकेश कुमार असं शिक्षकाचं नाव असून हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामधील एका विद्यार्थ्यांचं वय 18 असून दुस-याला वयाची 18 वर्ष पुर्ण होण्यासाठी अजून दोन महिने बाकी आहेत. पश्चिम दिल्लीतील नानगलोई परिसरात ही घटना घडली आहे.
आरोपी विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. शाळेत परीक्षा सुरु असताना अचानक तो वर्गात घुसला आणि मुकेश कुमार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर दुसरा आरोपी मित्रदेखील परीक्षा सोडून भांडणात सहभागी झाला. 'मुलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी हल्ला केला. त्यांनी मुकेश कुमार यांच्यावर अनेक वार केले आणि तिथून पळ काढला,' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
'मी उत्तरपत्रिका जमा करत होतो. त्यावेळी मला गोंधळाचा आवाज आला, मी पाहिलं तेव्हा दोन विद्यार्थी पळत होते. वर्गात जाऊन पाहिलं तेव्हा मुकेश कुमार रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून होते. आम्ही तात्काळ त्यांनी रुग्णालयात नेलं,' अशी माहिती उपस्थित शिक्षकाने दिली आहे.
Teachers protesting at Nangloi’s govt school where a teacher was stabbed to death by 2 class 12th students. pic.twitter.com/6nZN6Gpd5g
— ANI (@ANI_news) September 27, 2016
आरोपी विद्यार्थ्यांनी मुकेश कुमार आणि मुख्याध्यापकांना अनेक वेळा धमकी दिली होती. दोघेजण परीक्षेत वारंवार नापास होत होते. या घटनेनंतर शिक्षकांनी सुरक्षेची मागणी करण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.