कडक सॅल्यूट! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची धडपड, 15 वर्षे शाळा गाठण्यासाठी ओलांडतात नदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 03:31 PM2023-09-12T15:31:48+5:302023-09-12T15:32:31+5:30
नदी ओलांडल्यावर दोन किलोमीटर चालत शाळेत पोहोचतात. त्यांच्या शाळेत 20 विद्यार्थी शिकतात.
शाळेत जाण्यासाठी काही मुलांना नदी पार करून जावं लागतं. आजही हेच पाहायला मिळतं. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात, शिक्षकांना शाळेत जाण्यासाठी तीन नद्या पार कराव्या लागतात. प्राथमिक शाळा केसेकोडोमध्ये तैनात असलेल्या लक्ष्मी नेतामसह पाच शिक्षक पावसाळ्याच्या दिवसात कंबरेएवढं पाणी असलेल्या नदीच्या पाण्यातून वाट काढत शाळेत पोहोचतात आणि हे गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या शिक्षकांची सध्या जोरदार चर्चा आहे.
नदीवर पूल बांधल्यास दिलासा मिळाला असता, परंतु पूल अद्याप अपूर्ण असून दोन वर्षांपासून बांधकाम पूर्ण झालेले नाही. कोयालीबेडा ब्लॉकच्या या भागात 15 किमीच्या परिघात केसेकोडो, अल्पार आणि चिलपारस या तीन प्राथमिक शाळा आहेत, जिथे जाण्यासाठी रस्ता नाही. शिक्षिका लक्ष्मी नेताम यांनी सांगितले की, त्या 2008 पासून केसेकोडो प्राथमिक शाळेत शिकवत आहेत. तेव्हापासून, लक्ष्मी, इतर सहकारी शिक्षकांसह, पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडून आपला जीव धोक्यात घालतात.
अनेकवेळा कंबरेपर्यंत पाणी असल्याने ते एका पिशवीत कपडे आणि मोबाईल फोन यांसारख्या इतर वस्तू घेऊन नदी पार करतात. नदी ओलांडल्यावर दोन किलोमीटर चालत शाळेत पोहोचतात. त्यांच्या शाळेत 20 विद्यार्थी शिकतात. शाळेत तीन शिक्षक आहेत. जिल्ह्यात सीताराम, कांदाडी अशी अनेक गावे आहेत, जिथे शिक्षक नदी-नाले ओलांडतात आणि पायवाटेने शाळेत पोहोचतात. इतरही अनेक गावे आहेत. ज्या गावात जाण्यासाठी रस्ताही नाही.
आलपर प्राथमिक शाळेचे शिक्षक फुलेंद्र यादव आणि मुख्याध्यापक हेमलाल ध्रुव यांनी सांगितलं की, केसेकोडो नदी ओलांडल्यानंतर आणखी दोन नद्या आहेत. या पार करून ते आलपर येथील प्राथमिक शाळेत पोहोचतात. शिक्षक फुलेंद्र सांगतात की ते घरून दोन जोड कपडे घेऊन जातात. भिजल्यामुळे ते कपडे बदलतात. अनेकवेळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने त्यांना शाळेतच रात्र काढावी लागली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.