विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपात शिक्षकाला मारहाण, निर्वस्त्र काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:16 PM2018-08-22T15:16:30+5:302018-08-22T15:20:39+5:30
एका विद्यार्थिनीशी केलेल्या कथित बलात्काराच्या आरोपात आंध्र प्रदेशातील एका शिक्षणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेश- एका विद्यार्थिनीशी केलेल्या कथित बलात्काराच्या आरोपात आंध्र प्रदेशातील एका शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर त्या शिक्षकाला कपडे काढून रस्त्यावरून फिरवण्यात आलं आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरू कस्बे या ठिकाणी घडली आहे.
तिथून जाणा-या लोकांनी याचा एक व्हिडीओही तयार केला आहे. 40 वर्षांच्या एका माणसाला कपडे काढून फिरवण्यात येत असल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. रामबाबू नावाचा हा शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होता. तो विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीबरोबर त्यानं शरीरसंबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्याही दिल्या. परंतु तिला रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यावेळी हे प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर भडकलेल्या नातेवाईकांनी शिक्षणाला पकडून मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून त्याला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले. पोलिसांची त्याची चौकशी केली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.