नेटवर्कसाठी शिक्षकांची रोज झाडावर ‘हजेरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 06:32 AM2018-10-06T06:32:06+5:302018-10-06T06:32:50+5:30
‘टू-जी’मुळे खोळंबा : झारखंडमधील गावात घडतो प्रकार
डाल्टनगंज : झारखंडमधील पालमू जिल्ह्यातल्या सोहरी खास या गावी सहा शिक्षक रोज सकाळी आपल्या शाळेच्या अंगणातील पळसाच्या झाडावर चढतात, तेव्हा त्यांच्या हातात बायोमेट्रिक रीडरला जोडलेला टॅब्लेट असतो. त्यावर ते बोटाचा ठसा उमटवून रोज आपली हजेरी लावण्याचा प्रयत्न करतात.
इंटरनेटचे कनेक्शन धड मिळत नसल्याने झाडावर चढून ते गवसण्यासाठी शिक्षकांना ही कसरत करावी लागते.
ज्यावेळी इंटरनेट कनेक्शन मिळत नाही त्यावेळी शिक्षक शाळेत ठेवलेल्या हजेरीपत्रकात सही करतात. म्हणजेच एकाच उद्दिष्टासाठी दोन-दोन गोष्टी बाळगाव्या लागतात. सोहरी खास शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, आमच्याकडे २ जी नेटवर्क असून, त्यामुळे इंटरनेट कनेक्ट होताना प्रचंड अडचणी येतात. शिक्षकांची हजेरीसाठी चाललेली धावपळ बघून विद्यार्थ्यांचीही करमणूक होते. राज्याच्या ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची अवस्था खूपच वाईट
आहे. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी २०१७ मध्ये ज्ञानोदय योजनेंतर्गत शाळांना ई-विद्या वाहिनी अॅप अपलोड केलेले टॅबलेट वितरित केले आहेत. शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी, तसेच मुलांचे प्रवेश, त्यांच्या गळतीचे प्रमाण व अन्य महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी या अॅपचा उपयोग केला जातो.
त्याचप्रमाणे शिक्षकांनी केलेली कामगिरी, शाळेच्या झालेल्या तपासणीचा अहवाल आदींची माहिती या अॅपद्वारे शिक्षणखात्याला कळविली जाते.
‘असून अडचण, नसून खोळंबा’
सरकारने २०१ ते १००० विद्यार्थिसंख्या असलेल्या प्रत्येक शाळेला दोन टॅबलेट दिले आहेत; मात्र ते वापरताना इंटरनेट कनेक्शनला येणाऱ्या अडचणींमुळे झारखंडमधील शिक्षकांची दमछाक होत असून, सरकारने या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशीही मागणी होत आहे.