‘टीईटी’ उत्तीर्ण आयुष्यभर वैध; केंद्राच्या निर्णयानं महाराष्ट्रातील ४० हजार उमेदवारांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:43 AM2021-06-04T08:43:06+5:302021-06-04T08:43:18+5:30
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतलेला हा निर्णय रद्द करीत गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नवी घोषणा केली. त्यानुसार एकदा टीईटी उत्तीर्ण झालेला उमेदवार नेहमीसाठी शिक्षकपदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी बंधनकारक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेतील यश केवळ सात वर्षेच वैध मानले जात होते. मात्र, आता एकदा ‘टीईटी’ उत्तीर्ण उमेदवाराचा निकाल आयुष्यभर वैध मानला जाणार आहे. त्यामुळे शिक्षणांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील ४० हजार उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सात वर्षांनंतर शिक्षक भरतीसाठी पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल, असा निर्णय ११ फेब्रुवारी २०११ रोजी घेण्यात आला होता.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतलेला हा निर्णय रद्द करीत गुरुवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नवी घोषणा केली. त्यानुसार एकदा टीईटी उत्तीर्ण झालेला उमेदवार नेहमीसाठी शिक्षकपदाच्या भरतीत सहभागी होऊ शकणार आहे.
महाराष्ट्रात २०१३मध्ये पहिल्यांदा टीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या ३१ हजार ७२ उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची वैधता जुन्या निर्णयानुसार २०२० मध्ये संपुष्टात आली, तर २०१४ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ९ हजार ५९५ उमेदवारांची वैधता यंदा संपुष्टात येण्याची भीती होती.
२०१२पासून दहा वर्षात राज्यात शिक्षक भरतीही झाली नाही. आता या ४० हजार ६६७ उमेदवारांना भरतीत सामील होता येईल.