जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:46 PM2024-09-30T12:46:05+5:302024-09-30T12:47:25+5:30
परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले.
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पुराचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमालपूर पंचायतीच्या भभौल गावात रात्री कोसी बंधारा फुटल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले असून, त्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पूरग्रस्त भागातील तिकेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्राथमिक शाळेतील शिक्षक आपला जीव धोक्यात घालून पेपर तपासण्यासाठी शाळेकडे निघाले आहेत. परीक्षेचे पेपर तपासण्याची जबाबदारी असलेले शिक्षक डोक्यावर उत्तरपत्रिका, एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हातात पिशवी घेऊन कर्तव्य बजावत असलेले पाहायला मिळाले.
स्वत:चा जीव धोक्यात घालून शिक्षक हे करताना दिसत होते. परिसरात पुराचे पाणी शिरले असून ते पाणी कंबरेपर्यंत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरीही ते या पाण्यातून विद्यार्थ्यांसाठी वाट काढताना दिसत आहेत. पुराच्या पाण्यातून जात असलेल्या शिक्षकाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच याची चर्चा देखील सर्वत्र रंगलेली आहे.