शिक्षकांनी अध्यापनाचा दर्जा सुधारावा- सत्यपाल सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:41 AM2018-07-28T03:41:38+5:302018-07-28T03:42:38+5:30
शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील, असे सिंह म्हणाले
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : दर्जेदार संशोधनात्मक कार्यासाठी पेटंट मिळावे यासाठी शिक्षकांनी अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे. यादृष्टीने सरकारच्या वतीने अनेक स्तरांवर काम केले जात आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री (उच्चशिक्षण) डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले. कुलगुरूंच्या परिषदेत ते बोलत होते. शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील. शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी नवीन केंद्र सुरू केले जात आहेत. एसआयसीटीईमार्फत तंत्रशास्त्र शिक्षण संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित परिषदेत सांगितले.
एसआयसीटीईने अभियांत्रिकी अभ्यासक्रमात बदल केला आहे. शिक्षकांनाही अध्यापनाची प्रगत पद्धत समजली पाहिजे. याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. या परिषदेत जारी करण्यात आलेल्या अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण अहवालात देशांतील ६०.४८ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. यापैकी ११.०४ टक्के महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. फक्त ३.६ टक्के महाविद्यालयात पीएच.डी. अभ्यासक्रम आहे. ३६.७ टक्के महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. ३३.७५ टक्के महाविद्यालयांत एकच अभ्यासक्रम आहे. यापैकी ८३ टक्के महाविद्यालये खाजगी आहेत.