भाजपासोबत बैठकीसाठी संघाकडे तूर्तास वेळ नाही
By admin | Published: May 20, 2015 01:44 AM2015-05-20T01:44:25+5:302015-05-20T01:44:25+5:30
सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तूर्तास दिल्लीला येऊ शकणार नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळविण्यात आले आहे.
मोदीविरोधी बंड थंड करण्याचा प्रयत्न : भागवतांची दिल्लीवारी लांबणीवर
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
भाजपासोबत दिल्लीत बैठक घेण्यास रा. स्व. संघाकडे वेळ नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी तूर्तास दिल्लीला येऊ शकणार नसल्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कळविण्यात आले आहे.
संघाची संपूर्ण यंत्रणा येत्या दोन महिन्यांत देशभरातील स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये अतिशय व्यस्त आहे. अपवाद केवळ कृष्णन गोपाल आणि सुरेश सोनी हे दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा. ते दिल्लीतील झंडेवाला कार्यालयात कायम तळ ठोकून आहेत. ‘घर वापसी’ आणि अन्य मुद्यांवरून दंड थोपटणाऱ्या घटकांना शांत करण्यात आले आहे. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंच यासारख्या संघ परिवारातील अग्रणी संघटनांनी मोदी सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनाही उपस्थित केलेल्या मुद्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देत संयम राखण्यास सांगण्यात आले आहे. अशा मुद्यांवर मोदी सरकारविरुद्ध जाहीरपणे टीका नको, अशी समज देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर विहिंपलाही सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. मोदी सरकारने राममंदिर मुद्याला दिलेली स्थगिती देशहिताची असल्याचे या संघटनेला पटवून देण्यात आल्याकडे संघाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधले.
नाराज मंत्र्यांना शांत राहण्याचा सल्ला
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि अन्य काही मंत्र्यांनी मोदी सरकार आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनाही सभ्यपणे संयम राखण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती रा.स्व. संघाच्या सूत्रांनी मंगळवारी लोकमतला दिली.
संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी अशी परंपरा राहिलेली नाही, असे जाहीरपणे सांगत गडकरींनी थेट सरकारवर हल्ला केला होता. गडकरींना शांत राहण्याचा सल्ला देताना संघनेत्यांना सध्याच मांजराच्या गळ्यात घंटा बांधली जाऊ नये, असे वाटते.
मोदी सरकार कमकुवत बनायला नको...
च्कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार कमकुवत होईल असे काहीही केले जाऊनये, असे संघाच्या नेतृत्वाला वाटते. गेल्या वर्षभरात मोदी सरकारने केलेल्या कामाची संघ नेतृत्वाने सार्वजनिक आणि खासगीरीत्या मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. चंद्रगुप्त मौर्य नंतर मोदी हेच पहिले हिंदू शासक आहेत. त्यामुळे हे सरकार कमकुवत बनेल, असेही चुकूनही काही केले जाऊ नये. काही नाराजीच्या बाबी असतील तर त्या सोडविल्या जातील, असे संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले.
अमित शहांबाबत नाराजीच
च्भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबदल संघात नाराजीबाबत कोणतीही शंका उरलेली नाही, मात्र बिहारमधील निवडणुकीपूर्वी पक्षनेतृत्वात बदल करणे शक्य नाही. दुसरी बाब म्हणजे चिंतेचे मुद्दे चर्चा करून सोडविले जाऊ शकतात. राजनाथसिंग यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांनी मंत्रिपद सोडण्याची भाषा करू नये, त्यातून योग्य संदेश दिला जाणार नाही, असे संघाच्या नेत्यांना वाटते.
संघ परिवारातील संघटनांना इशारा
च्मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांमध्ये अडसर आणू नका, असा इशारा नागपुरात जाहीररीत्या देत संघाचे संयुक्त सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी संघ परिवारातील संघटनांना खडे बोल सुनावले आहे. संघाने सर्व मंत्रालयातील चिंतेच्या मुद्यावर ७२ कलमी यादी केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवतानाच त्यापैकी ३० मुद्यांवर तातडीने कृती करण्याची गरज अधोरेखित केली आहे. सरकार योग्य मार्गावर असून सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करायला हवी. निवडक संघर्षापेक्षा प्रतिसादात्मक सहकार्यावर भर दिला जावा, असे संघाला वाटते. त्यामुळेच काही मंत्र्यांची नाराजी असतानाही संघाने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीला व्यापकरीत्या सहमती दर्शविल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.