संघाचा ऐतिहासिक विजयादशमी उत्सव शनिवारी, अर्थव्यवस्था व केंद्राच्या कामगिरीवर सरसंघचालक काय भूमिका मांडणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:50 PM2017-09-28T21:50:51+5:302017-09-28T21:51:15+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रविदास साधूसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास हे उपस्थित राहणार आहेत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जालंधर येथील श्री गुरू रविदास साधूसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास हे उपस्थित राहणार आहेत तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व जालंधर येथील श्री गुरू रविदास साधूसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास महाराज यांना संघाने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून सामाजिक समरसतेचा संदेश दिला आहे. दलित समाजात त्यांना मान्यता असून त्यांनी अनेक विकासकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गरीब व दलित समाजाच्या उत्थानासाठी त्यांचे विशेष काम चालते. बाबा निर्मलदास महाराज मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘म्युनिसिपल वर्कर्स संघ’ या संस्थेचे ते अ. भा. प्रमुख संरक्षक व ‘अखिल भारतीय हरिजन लीग’चे राष्ट्रीय महामंत्री सत्यप्रकाश राय यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे संघाचा विजयादशमी उत्सव हा सामाजिक समरसतेचा उत्सव मानण्यात येतो. बुद्ध, मुस्लिम, जैन, शीख इत्यादी धर्माचे व पंथांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होत आले आहेत.
शासन-समाज समन्वयावर भाष्य करणार सरसंघचालक
नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेची झालेली अवस्था आणि केंद्राची भूमिका यावर सरसंघचालक नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संघाच्या गणवेशात ‘फुलपॅन्ट’चा समावेश झाल्यानंतरचा हा दुसरा विजयादशमी उत्सव राहणार आहे.
केंद्र शासनाची कामगिरी, चिनी वस्तूंविरोधात संघाने घेतलेली भूमिका, पाकिस्तान व चीनसंदर्भातील शासनाचे धोरण, केरळ तसेच पश्चिम बंगालमध्ये संघ स्वयंसेवकांवर होणारे हल्ले, सामाजिक समरसता, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
‘व्हीव्हीआयपी’ स्वयंसेवक येणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित राहणार आहेत. सद्यस्थितीत राजकीय परिघातून काहीसे बाहेर गेलेले अडवाणी बºयाच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. सोबतच शहरातील खासदार, आमदार यांचीदेखील उपस्थिती असेल.
स्वयंसेवकांमध्ये उत्साह
देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा चौथा विजयादशमी उत्सव असला तरी शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा, चीन व पाकिस्तानविरोधातील केंद्र शासनाचे कडक धोरण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ््याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.
कोण आहेत बाबा निर्मलदास
बाबा निर्मलदास यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सहभाग असतो. त्यांच्या संस्थेद्वारे रसूलपूर येथे सर्व आधुनिक सुविधांनीयुक्त असे धर्मार्थ रुग्णालय तसेच दोन शाळा चालविण्यात येतात. दरवर्षी ते जम्मू काश्मीर ते हरिद्वार अशी एक यात्रा आयोजित करतात ज्यामध्ये हजारो भाविकांचा सहभाग असतो. हरिद्वारला त्यांनी श्री गुरू रविदास घाट, श्री गुरू रविदास द्वार व श्री गुरू रविदास धर्मशाळा बांधलेली आहे.