चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 04:51 PM2018-01-29T16:51:37+5:302018-01-29T16:52:44+5:30
चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून अंत झाला आहे.
तामिळनाडू- चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून अंत झाला आहे. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडाचा रहिवासी असलेला चैतन्य हा देशांतर्गत प्रवास करण्यासाठी चेन्नई विमानतळावर आला असता, निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एका प्रत्यक्षदर्शीनं पोलिसांना सांगितलं की, चैतन्य हा विमानतळावरील पुलाच्या रेलिंगवर बसला होता. त्या रेलिंगवरूनच त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. तो व्यक्ती एकतर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असावा किंवा रेलिंगवर बसला असावा, असं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समजतं आहे.
त्या उड्डाणपुलाचा वापर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना सोडण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीनं आत्महत्या तर केली नाही ना, याचा पोलीस तपास करत आहेत. चैतन्य हा हाडांच्या विकारानं ग्रस्त होता. तसेच त्याच्याजवळ कोणतीही बॅग अथवा तिकीट नव्हते. कदाचित त्याच्या आयफोनमध्ये ई-तिकीट असावी. परंतु या दुर्घटनेत त्याचा अॅपलचा आयफोन फुटला आहे.