विमानात बदलली बॅग; इंजिनीयर तरूणाकडून थेट इंडिगोची वेबसाईट हॅक; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 11:46 AM2022-04-01T11:46:04+5:302022-04-01T11:48:00+5:30
एअरलाईन्सकडून थंड प्रतिसाद मिळाल्यानं थेट वेबसाईटच हॅक; इंजिनीयर तरुणाच्या कारनाम्याची सर्वत्र चर्चा
पाटणा: प्रवाशांच्या बॅग्स बदलल्या गेल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. सामान हरवल्याची तक्रार प्रवासी एअरलाईन्सच्या कस्टमर सर्व्हिस डेस्क किंवा वेबसाईटवर करतात. मात्र बऱ्याचदा एअरलाईन्सकडून प्रतिसाद मिळण्यास विलंब होतो. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानानं पाटण्याहून बंगळुरूला जात असलेल्या एका इंजिनीयर तरुणाला असाच अनुभव आला.
सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या नंदन कुमार यांची बॅग फ्लाईटमध्ये बदलली. त्याची माहिती त्यांनी एअरलाईनच्या साईटवर दिली. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नंदन यांनी केलेल्या कारनाम्याची चर्चा जगभरात सुरू आहे. सोशल मीडियावर नंदन यांनी केलेला कारनामा व्हायरल झाला आहे. आपल्यासोबत घडलेला प्रकार स्वत: नंदन यांनी ट्विटरवरून सांगितला आहे.
इंडिगोच्या फ्लाईट 6E-185 मधून पाटण्याहून बंगळुरूला जात होते. त्यावेळी लगेज काऊंटरवर एका सहप्रवाशासोबत सामनाची अदलाबदल झाली. आपली हरवलेली बॅग शोधून काढण्यासाठी काय काय केलं याची माहिती नंदन यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. बॅग बदली झाल्याचं लक्षात येताच नंदन यांनी प्रथम इंडिगोच्या कस्टमर डेस्कशी संपर्क साधला. मात्र सामानाची माहिती मिळाली नाही. त्यानंतर नंदन यांनी एअरलाईन्सची वेबसाईट हॅक केली.
इंडिगोच्या वेबसाईटवरून नंदन यांनी सहप्रवाशाचं नाव आणि पत्ता शोधून काढला. त्यानंतर त्याच्याशी फोनवरून संवाद साधला. योगायोगानं तो प्रवासी नंदन यांच्या जवळपासच राहत होता. नंदन यांनी त्याची भेट घेऊन बॅग बदलली. त्यानंतर त्यांनी याची माहिती ट्विट करून दिली. इंडिगो एअरलाईन्सच्या वेबसाईटमध्ये कुठे त्रुटी आहेत तेदेखील नंदन यांनी सांगितलं. एअरलाईन्सनं ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, त्यांना सहकार्य करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.