रेल्वे फाटकांवरील अपघात टाळणार ‘इस्रो’चे तंत्रज्ञान
By admin | Published: June 26, 2017 01:16 AM2017-06-26T01:16:37+5:302017-06-26T01:16:37+5:30
पहारेकरी नसलेल्या रेल्वे फाटकांवर रस्त्यावरील वाहने आणि भरधाव येणारी रेल्वगाडी यांच्यात टक्कर होऊन घडणारे भीषण अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पहारेकरी नसलेल्या रेल्वे फाटकांवर रस्त्यावरील वाहने आणि भरधाव येणारी रेल्वगाडी यांच्यात टक्कर होऊन घडणारे भीषण अपघात टाळण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) विकसित केलेले तंत्रज्ञान वापरण्याचे रेल्वेने ठरविले आहे.
यासाठी ‘इस्रो’ने विकसित केलेली उपग्रहावर आधारित ‘इंटेग्रेटेड सर्किट चिप’ (आयसी चिप) रेल्वेच्या इंजिनात बसविली जाईल. या चीपमुळे रेल्वेगाडी फाटकाच्या जवळ येऊ लागली की, पहारेकरी नसला तरी, फाटकापाशी बसविलेला भोंगा आपोआप वाजू लागेल.
यामुळे फाटकातून रेल्वेरुळ ओलांडू पाहणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना गाडी येत असल्याची पूर्वसूचना मिळेल.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वेगाडी फाटकापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असताना इंजिनातील या ‘आयसी चिप’मुळे फाटकावर भोंगा वाजू लागेल. गाडी जसजशी फाटकाच्या जवळ येईल तसा भोंग्याचा आवाज वाढत जाईल व गाडी फाटक ओलांडून पार झाली की भोंगा वाजणे बंद होईल या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, सुरुवातीस मुंबई आणि
गुवाहाटी राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनांमध्ये अशा ‘आयसी चिप’ प्रायोगिक तत्त्वावर बसविल्या जातील.
तसेच या गाड्यांच्या मार्गावर असलेल्या २० विनापहारेकरी रेल्वे फाटकांवर या चिपमुळे वाजणारे भोंगेही बसविले
जातील. टप्प्याटप्प्याने आणखी रेल्वेगाड्याही या तंत्रज्ञानाने सज्ज केल्या जातील.
गाड्यांचा ठावठिकाणा कळेल-
या चिप उपग्रहाशी संलग्न असल्याने संपूर्ण प्रवासात रेल्वेगाडीचा नेमका ठावठिकाणाही त्यामुळे अचूक कळू शकेल. सध्या ही माहिती मार्गावरील स्थानकांतील कर्मचाऱ्यांकडून गोळा केली जाते. नव्या तंत्रज्ञानामुळे एखादी गाडी अमूक वेळेला नेमकी कुठे आहे याची माहिती प्रवाशांना त्याच वेळी देणेही शक्य होईल. या चिपमुळे रेल्वेमार्गाच्या परिसरातील भागाचे ‘मॅपिंग’ करणेही शक्य होईल आणि अपघाताच्या वेळी गाडी नेमकी कुठे आहे व तेथील भूप्रदेश कसा आहे हेही समजू शकेल.
देशभरात रेल्वेमार्गांवर पहारेकरी नसलेली सुमारे १०००० फाटके आहेत व एकूण रेल्वे अपघातांपैकी ४० टक्के अपघात अशा फाटकांवर होत असल्याने हा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे.
यावर रेल्वे निरनिराळे उपाय शोधत असते. फाटक बंद करायचे म्हटले, तर तेथे रेल्वेमार्गावरून रस्त्याचा पूल बाधावा लागतो किंवा रेल्वेमार्गाखालून रस्ता न्यावा लागतो. हे काम खर्चिक आहे व सर्व ठिकाणी ते शक्य होतेच असेही नाही. गेल्या दोन वर्षांत अशी सुमार २४०० फाटके बंद केली गेली आहेत.