टिकटॉकवरील मित्राला भेटायला तिनं सोडलं घर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 03:22 PM2019-11-25T15:22:19+5:302019-11-25T15:38:39+5:30
टिकटॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे.
लखनऊ - टिकटॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मोठ्या प्रमाणात युजर्स टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतात. टिकटॉकमुळे एका 13 वर्षीय मुलीने घरं सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी मुलीने घरातून पळ काढल्याची घटना नोएडामध्ये घडली आहे. ऑनलाईन अभ्यास करता यावा यासाठी पालकांनी मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला होता. मात्र मुलीने जास्त वेळ हा टिकटॉकवर खर्च केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा येथे 13 वर्षीय मुलगी आपल्या पालकांसोबत राहते. सध्याचं जग हे डिजिटल असल्याने पालकांनी देखील मुलीला ऑनलाईन अभ्यास करता यावा यासाठी नवा स्मार्टफोन घेऊन दिला. अभ्यास न करता मुलगी जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावर खर्च करत होती. त्याच दरम्यान टिकटॉकवरील एका तरुणाशी तिची ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर तरुणाने मुलीला भेटायला बोलावलं.
टिकटॉक मित्राला भेटण्यासाठी मुलीने घरातून पळ काढला आणि थेट लखनऊ गाठलं. चारबाग रेल्वे स्थानकात हो दोघे एकमेकांना भेटले. त्यांच्या वागण्या-बोलण्यावर संशल आल्यावर जीआरपीच्या जवानांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान मुलगी घरातून पळून आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं काही दिवसांपूर्वी दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं होतं. बाईकवर असलेल्या दोन तरुणांचा पिस्तूल हातात घेतलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये ही घटना घडली. महू-नीमच महामार्गावर दोन तरुणांनी एक टिकटॉक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये बाईकवर असलेल्या तरुणांच्या हातात एक पिस्तूल दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरला झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हातावर असलेल्या नावाच्या टॅटूवरून तरुणांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. राहुल आणि कन्हैया अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं असून हे दोघे मंदसौरचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे असलेली बाईक आणि पिस्तूल पोलिसांनी जप्त केली.