मुलांच्या प्रेम पत्रावरुन झाला राडा; दहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 03:32 PM2019-02-23T15:32:05+5:302019-02-23T15:38:03+5:30
एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली.
राजकोट : एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिला आय लव्ह यू असे बोलत होता आणि तिच्या शाळेच्या बॅगमध्ये प्रेम पत्र ठेवत होता, असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे. मात्र, मुलाच्या घरच्या मंडळींनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, जखमींना राजकोटमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्यांने सांगितले की, मुलगा त्रास देत असल्याचे मुलीने आपल्या घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांसोबत याबाबत चर्चा केली. त्यावेळी दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली असता मुलाच्या घरच्यांनी मुलीकडील लोकांच्या अंगावर मिरची पूड फेकली. तसेच, लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण केली. यामध्ये सहा लोक जखमी झाले आहेत.
आमच्या मुलाने प्रेम पत्र लिहिले नाही...
मुलाच्या घरच्यांनी सुद्धा मुलीकडील लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. बदनाम करण्यासाठी मुलीच्या घरच्यांनी प्रेम पत्र लिहिल्याचा खोटा आरोप केला आहे. आमच्या मुलाने कोणतेही प्रेम पत्र लिहिले नाही, असे मुलाच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.