दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची तहरिक-ए-तालिबानची धमकी; सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:58 AM2022-03-24T07:58:45+5:302022-03-24T08:00:52+5:30
काही जणांना पाठविला ई-मेल; सुरक्षा केली अधिक कडक
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने दिली आहे. तसे ई-मेल काही जणांना पाठविण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सरोजिनी मार्केटसह इतर ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली होती.
बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारे ई-मेल आल्यानंतर, काही जणांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. बॉम्बहल्ला होण्याचा धोका लक्षात घेऊन सरोजिनी मार्केट तेथील व्यापाऱ्यांनी काही कालावधीसाठी बंद ठेवले आहे, पण आम्ही असा कोणताही आदेश व्यापाऱ्यांना दिलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहरिक-ए-तालिबानने धमकीच्या ई-मेलमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम दिल्ली पोलिसांचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हाती घेतले आहे.
‘तहरिक’ची पाळेमुळे पाकिस्तानात
बाॅम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा ई-मेल पाठविणारी तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेची पाकिस्तानात पाळेमुळे आहेत. तहरिकच्या दहशतवाद्यांनी २०१४ मध्ये पेशावरमध्ये एका शाळेवर हल्ला केला होता. त्यात १३२ मुलांसह १४९ जणांचा मृत्यू झाला होता. तहरिक-ए-तालिबानचे भारतातही हस्तक असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे.