तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:27 PM2024-05-13T17:27:02+5:302024-05-13T18:31:09+5:30
Lok Sabha Election 2024 : आरजेडीचे नेते तेजप्रताप यांनी एका कार्यकर्त्याला मंचावरून सर्वांसमोर ढकलले.
पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तर उर्वरित टप्प्यांसाठी प्रचार सुरु आहे. दरम्यान, बिहारमधून एक घटना समोर आली आहे. आरजेडीचे नेते तेजप्रताप यांनी एका कार्यकर्त्याला मंचावरून सर्वांसमोर ढकलले. यानंतर कार्यकर्ता खाली पडला. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार मिसा भारती यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यानंतर श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये आयोजित सभेत मिसा भारती आल्यानंतर ही घटना घडली. व्हिडिओमध्ये तेजप्रताप एका कार्यकर्त्याला धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मीसा भारती मंचावर तेजप्रताप यांचे लक्ष लोकांकडे वेधण्याचा प्रयत्न करताना दिसले, पण तेजप्रताप यांचा राग शांत होत नव्हता आणि ते रागाने कार्यकर्त्याकडे धावले. त्यानंतर मंचावर उपस्थित नेत्यांनी त्यांना थांबवले.
श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये आयोजित सभेत आरजेडी नेते तेजप्रताप यादव यांच्याजवळ उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वृत्तानुसार, कार्यकर्ता तेजप्रताप यांच्या पायावर चढला होता, त्यानंतर तेज प्रताप संतापले आणि त्यांनी त्यांना ढकलले. दरम्यान, पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघ पाटणा जिल्ह्यात येतो. सध्या भाजपाचे राम कृपाल यादव येथून खासदार आहेत. यावेळी महाआघाडीने मिसा भारती यांना तिकीट देऊन ही जागा चर्चेत आणली आहे. या जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.