जगात वाढतोय 'Tejas'चा मान; हे 'मेड इन इंडिया' लढाऊ विमान खरेदीसाठी 4 देश रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:40 PM2023-12-07T21:40:20+5:302023-12-07T21:41:33+5:30
भारतात तयार झालेल्या स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' विमानाची जगभरात चर्चा सुरू आहे.
Tejas Aircraft: आतापर्यंत भारत सरकार इतर देशांकडून लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर इत्यादींची खरेदी करायचे. पण, आता भारतातच स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान 'तेजस' बनवण्यात आले आहे. या 'मेड इन इंडिया' लढाऊ विमानाची जगभरात चर्चा होत आहे. यामुळेच एक-दोन नव्हे, तर चार देश या विमानाच्या खरेदीसाठी रांगेत उभे आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड(एचएएल)चे अध्यक्ष आणि एमडी सीबी अनंतकृष्णन यांनी याचा खुलासा केला आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या फायटर जेटमधून उड्डाण केले होते.
तेजस हे भारतात विकसित केलेले पहिले स्वदेशी लढाऊ विमान आहे. याची धूम आता जगभर ऐकू येत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी तेजसचे कौतुक केले आहे. हे एक इंजिन असलेले विमान असून, कोणत्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने काम करण्यास सक्षम आहे. त्यामुळेच आता हे विमान खरेदी करण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येकाला या भारतीय तंत्रज्ञानाचा आपल्या युद्ध ताफ्यात समावेश करून स्वत:ला बळकट करायचे आहे.
A flight to remember! Tejas is India’s pride, a manifestation of the strength and skills of 140 crore Indians. pic.twitter.com/n8hZk6fGKc
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023
तेजस खरेदीसाठी हे देश रांगेत
भारतीय तेजस खरेदीसाठी नायजेरिया, फिलीपिन्स, अर्जेंटिना आणि इजिप्त रांगेत आहेत. एचएएलचे अध्यक्ष अनंतकृष्णन यांच्या मते या सर्व देशांकडून संभाव्य खरेदीसाठी चर्चा सुरू आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जर चर्चा यशस्वी झाली तर या देशांना तेजसचा पुरवठा केला जाईल. विशेष म्हणजे अर्जेंटिनाला तेजसचा पुरवठा करण्यासाठी वेगळा मार्ग शोधला जाणार आहे.
अर्जेंटिनाची 'ही' समस्या
भारत तेजसमध्ये ब्रिटीश भाग वापरतो, ज्यासह तेजस अर्जेंटिनाला पाठवता येत नाही. हा करार पूर्ण करण्यासाठी ब्रिटीश भागांऐवजी रशियन भाग तेजसमध्ये बसवले जातील. 1982 च्या फॉकलँड्स युद्धानंतर ब्रिटनने अर्जेंटिनाला लष्करी उपकरणे विकण्यावर बंदी घातली होती. विशेषतः ब्रिटनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर अर्जेंटिनामध्ये बंदी आहे. त्यामुळे, हा करार पूर्ण करण्यासाठी तेजसचे भाग बदलले जाण्याची शक्यता आहे.
Successfully completed a sortie on the Tejas. The experience was incredibly enriching, significantly bolstering my confidence in our country's indigenous capabilities, and leaving me with a renewed sense of pride and optimism about our national potential. pic.twitter.com/4aO6Wf9XYO
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023
तेजसचे फीचर्स
तेजस अॅल्युमिनियम, लिथियम मिश्र धातुसह फायबर कंपोझिट स्टीलने बनलेले आहे. त्यामुळे इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत ते वजनाला हलके आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फायटर प्लेन हलके असल्यामुळे लँडिंग आणि टेक ऑफसाठी अतिशय लहान धावपट्टीची आवश्यकता आहे. हे विमान 2019 मध्येच लष्करात दाखल झाले होते, तेव्हापासून याने जगावर आपली छाप सोडली आहे.
तेजस मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन जाऊ शकते. तसेच, दुर्गम भागातही याची लँडिंग आणि टेक ऑफ करण्याची ताकद आहे. तेजस हवामानातील कोणत्याही अडथळ्यांचा सामना करू शकते. तेजस हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यासही सक्षम आहे. तेजस विमान एकाच वेळी सुमारे 10 टार्गेट उडवू शकते.