तेजस, शताब्दीमधील मनोरंजन होणार बंद, प्रवाशांनी प्रताप केल्याने रेल्वेने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:22 AM2018-03-15T04:22:25+5:302018-03-15T04:22:25+5:30
तेजस व शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना यापुढे सीटच्या मागे लावलेल्या एलसीडीवर चित्रपट किंवा व्हिडीओज बघता येणार नाहीत ना गाणी ऐकायला मिळतील.
नवी दिल्ली : तेजस व शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना यापुढे सीटच्या मागे लावलेल्या एलसीडीवर चित्रपट किंवा व्हिडीओज बघता येणार नाहीत ना गाणी ऐकायला मिळतील. याचे मुख्य कारणही प्रवासीच आहेत. प्रवाशांनी या उपकरणांची नासधूस केल्यामुळे रेल्वेने या दोन्ही रेल्वेच्या सगळ््या डब्यांतून एलसीडी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येही एलसीडी स्क्रीन्स होते. या स्क्रीन्सची नासधूस झाल्याचे, वायर तुटल्याचे व हेडफोन्स चोरीला गेल्याचे आढळले होते. प्रवासात करमणुकीची ही सेवा रद्द करण्याची ही कारणे असल्याचे रेल्वेने सांगितले. रेल्वे बोर्डाने फेब्रुवारीमध्ये सर्व विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांनुसार स्क्रीन्स काढून घेण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई ते गोवा दरम्यान गेल्या वर्षी मे महिन्यात पहिली तेजस एक्स्प्रेस अतिशय उत्तम दर्जाच्या सुखसोयींसह सुरू झाली. त्यातही करमणुकीच्या या उपकरणांची वारंवार नासधूस होत असल्याचे आढळले.
>वाय-फाय सुरू करणार
प्रवासी आता स्मार्टफोन्स वापरतात. त्यांच्यासाठी रेल्वेत वाय-फाय सेवा असेल. त्यामुळे करमणुकीची उपकरणे काढून घेतली जातील, असे रेल्वे मंडळाचे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे संचालक वेद प्रकाश यांनी सांगितले.