तेजस एक्स्प्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार? आयआरसीटीसीकडून हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:29 PM2020-09-30T14:29:14+5:302020-09-30T14:29:39+5:30
आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे.
नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीजन म्हणजेच दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस ट्रॅकवर पुन्हा धावण्याची शक्यता आहे. 'सीएनबीसी आवाज'ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) रेल्वे मंत्रालयाला 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यास तसेच लीज शुल्क माफ करण्यास सांगितले आहे.
तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली-लखनऊ, अहमदाबाद-मुंबई आणि वाराणसी-इंदूर दरम्यान खासगी ट्रेन सुरू करण्यात आल्या. मात्र, कोरोना विषाणूच्या महामारीनंतर 22 मार्चपासून या ट्रेनची वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, या खासगी ट्रेनचे परिचालन आयआरसीटीसीच्या माध्यातून करण्यात येते.
कधीपासून सुरु होणार तेजस ट्रेन?
तेजस ही खासगी ट्रेन आयआरसीटीसी सुरु करणार असल्याची माहिती सुत्रांनी 'सीएनबीसी आवाज'ला दिली आहे. याबाबत आयआरसीटीसीने रेल्वेला पत्र लिहिले आहे. आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. तसेच, रेल्वेलाही लीज शुल्क माफ करण्यास सांगितले आहे. खासगी ट्रेन तेजससाठी आयआरसीटीसी दररोज 13 लाख रुपये लीज शुल्क देते.
तेजस एक्सप्रेस आपल्या खास प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये उत्कृष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि ड्रिंक विनामूल्य आहेत. तसेच, ट्रेनला उशिरा झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाते. एका तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 100 रुपये आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्या 250 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते.
या मार्गांवर खासगी ट्रेन धावते
देशाची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लखनऊ ते दिल्ली मार्गावर सुरु झाली. त्यानंतर अहमदाबाद-मुंबई मार्गावर दुसरी खासगी ट्रेन सुरू झाली. तिसरी खासगी ट्रेन वाराणसीहून इंदूरसाठी सुरु करण्यात आली.