तेजस विमानांना अमेरिकी इंजिन मिळणार; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यात मोठा संरक्षण करार शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 06:04 AM2023-06-07T06:04:43+5:302023-06-07T06:05:17+5:30
धोरणात्मक दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदींचा दौरा पुढील पाच दशके स्मरणात रहावा, असे प्रयत्न आहेत.
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात २१ ते २४ जूनदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ही भेट संस्मरणीय बनवण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार व संरक्षण मंत्रालयांच्या पथकांनी कंबर कसली आहे. धोरणात्मक दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदींचा दौरा पुढील पाच दशके स्मरणात रहावा, असे प्रयत्न आहेत. यासाठी सर्वांत ठोस पाऊल संरक्षण क्षेत्रात उचलण्याची तयारी आहे.
या दौऱ्यादरम्यान ३५० लढाऊ विमानाच्या जेट इंजिनच्या भारतात उत्पादनाचा करार २२-२३ जून राेजी होऊ शकतो. (वृत्तसंस्था)
...म्हणून हा करार आहे महत्त्वाचा
स्वदेशी हलकं लढाऊ विमान तेजसमध्ये कमी शक्तीचे जीई इंजिन बसवण्यात आले आहे. मार्क-द्वितीय व एएमसीए या पाचव्या पिढीतील स्वदेशी लढाऊ विमानातही जीई-४१४ हे इंजिन असेल. १९६३ पासून वापरले जाणारे रशियन मिग लढाऊ विमान पुढील तीन वर्षांत निवृत्त होणार आहे. त्यानंतर अमेरिकन इंजिनांनीयुक्त लढाऊ विमाने तयार होतील. जनरल इलेक्ट्रिक (जीई) व हिंदुस्थान एरोनॉटिक्स यांच्यात हा करार होण्याची शक्यता आहे. देशाच्या लढाऊ विमान उत्पादन प्रकल्पासाठी करार महत्त्वाचा आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे या इंजिनची निर्मिती केली जाईल.
ड्रोन खरेदीचाही करार होणार
- पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ३० एमक्यू-९ बी लढाऊ ड्रोन खरेदीचा करार होण्याची शक्यता आहे. हा करार २२ हजार कोटींचा असू शकतो. तिन्ही लष्करांना असे १० ड्रोन मिळणार आहेत.
- दोन टन वजनी लष्करी उपकरणे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे ड्रोन सलग ४८ तास उड्डाणासह ६ हजार किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात कामगिरी करू शकतात. सेन्सर्स आणि लेझर-गाइडेड बॉम्बयुक्त हे ड्रोन हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत.