तेजस रेल्वेत करमणुकीची साधने
By admin | Published: July 11, 2016 04:20 AM2016-07-11T04:20:23+5:302016-07-11T04:20:23+5:30
तेजस या रेल्वेत करमणुकीची अद्ययावत साधने दाखल होणार आहेत. ही रेल्वे लवकरच कात टाकणार असून, वायफायसह अंधांसाठी ब्रेल लिपीत सूचना यात मिळणार आहेत.
नवी दिल्ली : तेजस या रेल्वेत करमणुकीची अद्ययावत साधने दाखल होणार आहेत. ही रेल्वे लवकरच कात टाकणार असून, वायफायसह अंधांसाठी ब्रेल लिपीत सूचना यात मिळणार आहेत. प्रवासाचा आनंद वाढविण्यासाठी प्रवाशांच्या सेवेला येणाऱ्या या रेल्वेचे डिझाईन तयार झाले आहे.
तेजस, अंत्योदय आणि हमसफर या रेल्वेंमध्ये या सुविधा मिळणार आहेत. तेजसचे डबेही नव्या रंगांनी चमकणार आहेत, तर हमसफरच्या डब्यांवरचा आकाशी रंग आता प्रवाशांचे लक्ष आकर्षून घेणार आहे. अर्थात, हे आम आदमीचे वाहन आहे, हाच संदेश यातून देण्यात येणार आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तेजस, हमसफर, अंत्योदय आणि दीन दयालूच्या डब्यांचे डिझाईन तयार आहे. तेजसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेयर कार असेल. तसेच प्रवाशांच्या मनोरंजनासाठी स्क्रीन आणि हॅण्ड फोन सॉकेटबरोबर सुरक्षा निर्देश देण्यासाठी एलईडी बोर्ड असतील, तर हमसफरमध्ये थर्ड एसी डबे असतील. या अद्ययावत रेल्वेत बायो वॅक्यूम टॉयलेटमध्ये सेन्सरचे नळ असतील. ओले हात कोरडे करणाऱ्या मशिन्स असतील. तेजसमध्ये चहा व कॉफीच्या मशीन ठेवलेल्या असतील. दैनिक आणि स्नॅक्स टेबलही असतील. तेजस आणि हमसफर दोन्हीमध्येही सीसीटीव्ही तसेच आग विझविणारे यंत्र असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)