Tejashwi Yadav : "मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित"; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:13 PM2024-04-09T17:13:41+5:302024-04-09T17:21:47+5:30
Lok Sabha Elections 2024 Tejashwi Yadav And Narendra Modi : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपासाठी बिहार अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या, तरीही बिहार जिंकणं आता भाजपासाठी सोपं नाही. यामुळेच अनेकांची नजर बिहारवर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अनेक निवडणूक दौरे केले आहेत, यावरूनच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी खोचक टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. मोदींच्या बिहार आगमनावर तेजस्वी यादव यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदी जर कशाला घाबरत असतील तर ते बिहारला घाबरतात. मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यांच्या बिहारमध्ये येण्याने काही फरक पडणार नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
"पंतप्रधानांनी बिहारमध्ये येऊन विकासावर बोलावं"
"भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे, भाजपाने तपास यंत्रणाही तैनात केल्या आहेत, पंतप्रधानांनी बिहारमध्ये येऊन कारखाने आणि गरिबीबद्दल बोललं पाहिजे, गुजरातमध्ये किती कारखाने उभारले ते पाहा. बिहारने प्रचंड बहुमत दिलं आहे तरीही बिहारमध्ये काहीच नाही" असंही म्हटलं आहे.
12 दिवसांत पंतप्रधानांचा तिसरा दौरा
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा बिहारचा दौरा केला आहे. 12 दिवसांत ते तिसऱ्यांदा बिहारमध्ये येत आहेत. 16 एप्रिल रोजी गया येथे त्यांची निवडणूक जाहीर सभा आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते गया लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार जीतन राम मांझी यांच्या समर्थनार्थ मतं मागतील. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींची जमुई येथे रॅली होती.