बिहारमध्येही महिलांसाठी योजना; सत्तेत आल्यास दरमहा २५०० रुपये देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:37 IST2024-12-14T18:36:30+5:302024-12-14T18:37:24+5:30

Tejashwi Yadav : सत्तेत आल्यास माई बहन मान योजनेंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

Tejashwi Yadav Promise To Give Rs 2500 Per Month To Women Mai Bahin Maan Yojana Announce | बिहारमध्येही महिलांसाठी योजना; सत्तेत आल्यास दरमहा २५०० रुपये देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा 

बिहारमध्येही महिलांसाठी योजना; सत्तेत आल्यास दरमहा २५०० रुपये देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. यानंतर आता देशातील विविध राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'माई बहन मान योजना' जाहीर केली आहे. सत्तेत आल्यास माई बहन मान योजनेंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी मतदारांसाठी घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी बिहारमधील ग्राहकांना '२०० युनिट मोफत वीज' देण्याचे आश्वासन दिले होते. दरभंगा येथील कार्यक्रमात महिलांसाठीच्या योजनेची घोषणा करताना तेजस्वी यादव म्हणाले, "राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही माई बहन मान योजना' सुरू करू. माई बहन मान योजनेअंतर्गत आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल माता-भगिनींना आर्थिक मदत देऊ. सरकार स्थापन होताच महिनाभरात ही योजना सुरू करू."

पुढे तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही सतत दौरे करत आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून सर्व माहिती घेत आहोत. लोक बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहेत. सरकारच्या उणिवा उघड करण्याचे काम आम्ही केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. उपमुख्यमंत्री असताना मी पाच लाख लोकांना नोकऱ्या दिल्या. आता बऱ्याच लोकांना सन्मान द्यावा लागेल आणि सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायही करू.

याचबरोबर, आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करू, आम्हाला संधी द्या. आम्ही रात्रभर फिरून यंत्रणेत सुधारणा केली. आजचा नीती आयोगाचा अहवाल बघा, आजही बिहार स्थलांतरात पहिल्या क्रमांकावर आहे. बेरोजगारीत नंबर वन आहे. आम्ही काम करणारे लोक आहोत आणि आमच्याकडे एक दृष्टी आहे, एक रोड मॅप आहे. आम्ही बिहारमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक आणली होती. तसेच, आम्ही मिथिलांचल आणि सीमांचलसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करू जेणेकरून या भागाचा विकास करता येईल, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

Web Title: Tejashwi Yadav Promise To Give Rs 2500 Per Month To Women Mai Bahin Maan Yojana Announce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.