Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:16 AM2024-10-09T10:16:03+5:302024-10-09T10:26:41+5:30
Tejashwi Yadav : विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शासकीय निवासस्थानातून सामान चोरल्याच्या आरोपावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला रिकामा करताना तेथील सामानसुद्धा आपल्यासोबत नेलं, असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. यावर आता तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "भाजपाने मीडियावाल्यांना बोलावून खोटा प्रचार केला आहे. इमारत बांधकाम विभाग यावर काहीच का बोलत नाही? बरं ते काहीही असो."
"कोणतेही पुरावे न देता भाजपाचे लोक असं घाणेरडं राजकारण करू शकतात. मला तर हसायला येत आहे, भाजपा आरजेडीला घाबरते. भाजपाला आमची प्रतिमा खराब करायची आहे. आम्ही नोकऱ्यांबद्दल बोललो आणि नोकऱ्या दिल्या. हे लोक घाबरून आमचं चारित्र्य खराब करू इच्छितात. भाजपा सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून त्यांना तेजस्वी यांची बदनामी करून सत्तेत यायचं आहे."
आपल्यावरील आरोपांवर तेजस्वी यादव म्हणाले की, याची चौकशी झालीच पाहिजे. त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहे. सीबीआय-ईडी फक्त त्यांच्यासोबत आहे. माझ्याकडे एक व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. फक्त माझंच नाही, या बंगल्यात आधी सुशील कुमार मोदी राहत होते, त्यानंतर तारकिशोर प्रसाद आले, त्यांनी काय आणलं आणि काय नेलं याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. आम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग करून दिला आहे.
"ज्यांनी खोटे आरोप केले आहेत त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या वकिलांशी बोललो आहोत. त्यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवली जाणार आहे. इमारत बांधकाम विभागाने याबाबत बोलायला हवं. गप्प का? जर त्यांनी काही सांगितलं नाही तर आम्ही त्याला त्यांनाही न्यायालयात घेऊन जाऊ. तेजस्वी जे म्हणतो ते करतो" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.