लोकसभेतील पराभवानंतर तेजस्वी यादवांचे पुनरागमन; 'यामुळे' होते राजकारणापासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:55 PM2019-06-29T13:55:11+5:302019-06-29T13:56:52+5:30
चमकी तापीमुळे बिहारमध्ये शेकडो मुलांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी तेजस्वी यादव कुठं आहे, असे सवाल उपस्थित झाले होते.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर गायब झालेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुनरगामन केले आहे. ट्विट करून तेजस्वी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून दूर राहण्याचे कारण सांगितले. बिहारमध्ये काँग्रेस-आरजेडीला दारुण पराभव पत्करावा लागला होता.
तेजस्वी यादव ट्विटमध्ये म्हणाले की, मित्रांनो लिगामेंट आणि एसीएल दुखापतीमुळे मी गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होतो. त्यावर उपचार घेण्यात आपण व्यस्त होतो. परंतु, माझ्या राजकीय विरोधकांचे आणि मीडियातील एका गटाच्या माझ्याविषयीच्या गंमतीदार स्टोरींचा मी आनंद घेत होतो, असंही तेजस्वी म्हणाले. या संदर्भात तेजस्वी यांनी सलग चार ट्विट केले.
Friends! For last few weeks I was busy undergoing treatment for my long delayed ligament & ACL injury. However, I’m amused to see political opponents as well as a section of media cooking up spicy stories.
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 29, 2019
तेजस्वी पुढे म्हणाले की, आमची जबाबदारी त्या लोकांविषयी आहे, जे आम्हाला समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायासाठी पर्याय समजतात. मी सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही इथंच आहोत. लढा कायम सुरू राहणार आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर चिंतन आणि विश्लेषण करण्यासाठी मला मदत मिळाल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.
चमकी तापीमुळे बिहारमध्ये शेकडो मुलांना आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी तेजस्वी यादव कुठं आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. परंतु, आरजेडीच्या पदाधिकाऱ्यांना त्याचवेळी पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच संसदेत हा प्रश्न उठविण्यास सांगितले होते, असंही तेजस्वी म्हणाले.