मोठा उलटफेर! तेजस्वी होतील बिहारचे CM, तर नितीश PM पदाचा चेहरा; लालूंच्या मेहुण्याचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:29 PM2022-08-09T13:29:45+5:302022-08-09T13:32:32+5:30
बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री नितीश कुमार कोणत्याही क्षणी भाजपाची साथ सोडून 'राजद'सोबत चूल मांडू शकतात.
नवी दिल्ली-
बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री नितीश कुमार कोणत्याही क्षणी भाजपाची साथ सोडून 'राजद'सोबत चूल मांडू शकतात. भाजपाला सोडचिठ्ठी देत महागठबंधनमध्ये आल्यावरही बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारच राहतील अशी माहिती असताना आता तेजस्वी यादवचे मामा प्रभुनाथ यादव यांनी खळबळजनक विधान केलं आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पाहायला मिळतील. दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे.
प्रभुनाथ यादव यांच्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांचे मेहुणे सुभाष यादव आणि साधु यादव हे लालू कुटुंबीयांशी नाराज आहेत. तर राबडी देवी यांचे थोरले बंधू प्रभुनाथ यादव यांचे मात्र लालू कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. तेजस्वी यांच्या लग्नावेळीही प्रभुनाथ यादव नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी राबडी देवींच्या घरी पोहोचले होते. त्यामुळे प्रभुनाथ यादव हे लालू कुटुंबीयांच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे.
महागठबंधन सरकार बनणार हे निश्चित
बिहारमध्ये सध्या सत्ता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नितीश कुमार भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. जदयूकडून भाजपावर पक्ष फोडीचा आरोप केला जात आहे. जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी जदयूमध्ये 'चिराग मॉडेल 2' ची भाजपा तयारी करत असल्याचा आरोप केला आहे. बिहारमध्ये सध्या जदयू आणि राजद मिळून महाआघाडीचं सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.
तेजस्वी यादव यांना गृहमंत्रीपद
नितीश-तेजस्वी सरकारमध्ये सर्व डील फायनल झाल्याचं सांगण्यात येत आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहतील तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रालय देण्यात येईल, असंही सांगण्यात येत आहे. बिहारमधील आजवरच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद मुख्यमंत्री व्यतिरिक्त इतर कुणाला दिलं जाण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.