आरजेडीमध्ये तेजस्वी यादवांचं वजन वाढलं, मिळाले तीन प्रमुख अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 21:36 IST2025-01-18T21:36:31+5:302025-01-18T21:36:55+5:30
Tejashwi Yadav: पक्षाच्या राष्ट्रीय कार्याकरिणीच्या बैठकीत आरजेडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील युवा नेते तेजस्वी यादव यांचं पक्षातील वजन वाढलं असून, त्यांचं स्थान हे पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या तोडीचं झालं आहे.

आरजेडीमध्ये तेजस्वी यादवांचं वजन वाढलं, मिळाले तीन प्रमुख अधिकार
यावर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय कार्याकरिणीच्या बैठकीत आरजेडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील युवा नेते तेजस्वी यादव यांचं पक्षातील वजन वाढलं असून, त्यांचं स्थान हे पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या तोडीचं झालं आहे. पक्षाने तेजस्वी यादव यांना आतापर्यंत केवळ लालूप्रसाद यादव यांच्यााकडे असलेले सर्व अधिकार दिले आहेत.
राष्ट्रीय जनता दलामध्ये तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यामध्ये पक्षावरील वर्चस्वावरून चढाई सुरू आहे. दरम्यान, पक्षालील वर्चस्वावरून नुकतीच लढाई दिसून आली होती. मात्र आता झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय जनता गलामध्ये केवळ तेजस्वी यादव यांचाच वरचष्मा राहील, हे स्पष्ट झाले आहे. तसेच निर्णय प्रक्रियेत तेजप्रताप यांची कुठलीही महत्त्वाची भूमिका नसेल हेही अधोरेखित झालं आहे. आतापर्यंत पक्षासंदर्भात लालूप्रसाद यादव हे जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय आता औपचारिकपणे तेजस्वी यादव यांना घेता येणार आहेत.
यासंदर्भात तेजस्वी यादव यांना तीन महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात येणार आहेत. आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तेजस्वी यादव यांना हे अधिकार देण्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच तो एकमताने पारित करण्यात आला. यामुळे आता तेजस्वी यादव यांना पक्षात लालूप्रसाद यादव यांच्या एवढेच अधिकार मिळाले असून, त्यांना निवडणुकांदरम्यान, पक्षाचं चिन्ह, नाव आणि कार्यक्रम निश्चित करण्याचा अधिकार असेल.