Tejinder pal singh Bagga: तेजिंदर पाल सिंग बग्गांना उच्च न्यायालयाचा दिलासा, 5 जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:42 PM2022-05-10T12:42:55+5:302022-05-10T12:43:28+5:30
Tejinder pal singh Bagga: भारतीय जनता पक्षाचे दिल्ली युनिटचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यावर प्रक्षोभक भाषण, तेढ निर्माण करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत.
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली युनिटचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या अटकेला 5 जुलैपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिलाय. मोहालीतील एका पोलिस ठाण्यात एप्रिलमध्ये बग्गाविरुद्ध प्रक्षोभक भाषण, शत्रुत्व पसरवणे आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी त्याला अलीकडेच दिल्लीतून अटकही केली होती.
पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. पोलीस त्यांना रस्त्याने पंजाबला घेऊन जात होते. मात्र वाटेत कुरुक्षेत्रात हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले आणि काही तासांनंतर दिल्ली पोलिसांनी बग्गाला परत आणले. दरम्यान, आज पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने बग्गा यांच्या अटकेला 5 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर केजरीवालांना आव्हान
न्यायालयाच्या निर्णयानंतर तेजिंदर बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना परत एकदा आव्हान दिले. "आज मी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा आव्हान देतो. आमच्यावर शेकडो खोट्या एफआयआर दाखल करा, पण आम्ही तुमच्यापुढे झुकणार नाही," असे बग्गा म्हणाले. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153-ए, 505 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.