माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:22 IST2025-02-20T14:09:20+5:302025-02-20T14:22:43+5:30

कालेश्वरम प्रकल्पांतर्गत मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या व्यक्तीची सुनावणीआधीच हत्या करण्यात आली.

Telagana man who accused KCR of corruption in Kaleshwaram project was murdered a day before the hearing | माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच...

माजी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची हत्या; सुनावणीच्या एक दिवस आधीच...

Medigadda Barrage Row:तेलंगणात सिंचन प्रकल्प कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी सुनावणी होण्याआधीच या व्यक्तीची हत्या झाली आहे. या हत्येनंतर तेलंगणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कालेश्वरम प्रकल्पांतर्गत मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप दाखल करण्यात आले होते. मात्र सुनावणीआधीच के चंद्रशेखर राव यांच्यावर आरोप करणाऱ्या एन.राजलिंगमूर्ती यांची हत्या करण्यात आली आहे.

तेलंगणातील भूपालपल्ली शहरात बुधवारी रात्री एन.राजलिंगमूर्ती यांची हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी एन.राजलिंगमूर्ती यांची चाकूने वार करून हत्या केली. राजलिंगमूर्ती यांनी बीआरएसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मेडिगड्डा बॅरेजचे काही खांब कोसळण्यास हेच लोक जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप होता. हा बॅरेज कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा भाग आहे. एन राजलिंग मूर्ती यांच्या हत्येनंतर आता दुसऱ्याच दिवशी केसीआर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या याचिकेत केसीआर यांनी मूर्ती यांनी दाखल केलेल्या खटल्याला आव्हान दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास राजलिंगमूर्ती मोटारसायकलवरून जात असताना दोन जणांनी त्यांना अडवले आणि चाकूहल्ला केला. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. राजलिंगमूर्ती यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये मेडिगड्डा बॅरेजचा काही भाग बुडल्यानंतर केसीआर आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली होती.
राजलिंगमूर्ती यांच्या मृत्यूची बातमी पसरताच त्यांच्या कुटुंबाने तातडीने कारवाईची मागणी करत आंदोलनाला सुरुवात केली.

गोदावरी नदीवर १ लाख कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पातील तीन बंधाऱ्यांपैकी पहिल्या मेडिगड्डा बॅरेजचा खांब कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. सिंचन तज्ञांना यावर अद्याप कायमस्वरूपी उपाय सापडलेला नसल्याने हा प्रकल्प रखडलेला आहे. राजलिंगमूर्ती यांनी त्यांच्या तक्रारीत केसीआर, माजी मंत्री हरीश राव, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मेघा कन्स्ट्रक्शन आणि एल अँड टीच्या प्रमुखांवर कालेश्वरम प्रकल्प कोसळल्याप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप केला होता. त्यांच्या याचिकेवर, भूपालपल्ली जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना नोटीस बजावली होती.

२३ डिसेंबर २०२४ रोजी केसीआर आणि हरीश राव यांनी उच्च न्यायालयात खटला रद्द करण्याची याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने अधिकार क्षेत्राचा अभाव असल्याचे सांगत भूपालपल्ली दंडाधिकारी न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली होती.

Web Title: Telagana man who accused KCR of corruption in Kaleshwaram project was murdered a day before the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.