बापमाणूस! नवजात बाळाच्या आईचा मृत्यू, मिळालं नाही दूध; वडिलांनी केली 10 किमी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:38 AM2023-03-27T11:38:12+5:302023-03-27T11:38:44+5:30
बाळाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर बाळाला दूध पाजणं हे वडिलांसाठी आव्हान बनले.
तेलंगणातील आदिलाबादमध्ये नवजात बाळाला पाजण्यासाठी एका कुटुंबाकडे दूध नसल्याची घटना समोर आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर बाळाला दूध पाजणं हे वडिलांसाठी आव्हान बनले. या वडिलांना दूध आणण्यासाठी 10 किलोमीटर पायपीट करावी लागली. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारचे मंत्री टी. हरीश राव यांनी तातडीने एक्शन घेत मदत केली.
मंत्र्यांनी कुटुंबासाठी गायीची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले जेणेकरुन कुटुंबाला बाळाची योग्य काळजी घेता येईल. नुकतीच घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, लोकांनी बाळाचा जीव वाचवण्यासाठी वेळेवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंत्र्यांचे कौतुक केले. जंगबाबू आणि कोडापा पारूबाई हे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील इंद्रावेली मंडलातील राजुगुडा या दुर्गम गावातील रहिवासी आहेत.
इंद्रावेली येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात पारूबाई यांनी जानेवारी महिन्यात एका मुलीला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पारूबाई आणि बाळाला त्यांच्या मूळ गावी आणले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पारूबाई यांचा 10 दिवसांनी मृत्यू झाला. ज्या दुर्गम खेडेगावात हे कुटुंब नवजात मुलीसह राहत आहे, तेथे शेळी, गाय अशी दुभती जनावरे उपलब्ध नव्हती.
गावात दुधाची पाकिटे उपलब्ध नसल्यामुळे वडिलांना दररोज 10 किलोमीटर पायी चालत जावे लागायचे. यानंतर ही बाब अर्थमंत्री हरीश राव यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या सूचनेवरून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला पाहायला जाऊन दुधाची पाकिटे व पौष्टिक अन्नाची पाकिटे कुटुंबीयांना दिली. त्यांनी मुलाच्या प्रकृतीची माहिती घेतली. मुलाचे वडील जंगबाबू यांच्या इच्छेनुसार या कर्मचार्यांनी एक गाय खरेदी करून ती गाय नातेवाईकांच्या स्वाधीन करत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"