हिंदुत्ववादी, मराठी मतांसाठी भाजपाने तेलंगणाच्या रिंगणात उतरवला 'टायगर'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:58 PM2018-10-22T20:58:15+5:302018-10-22T20:59:56+5:30
हैदराबादच्या राजकीय रणांगणात घोशामहल मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. शहरातील मध्यवर्ती भागात हा मतदारसंघ असून येथे टी राजा यांचा मोठा प्रभाव आहे.
हैदराबाद - तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपनेही जोरदारी तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपाने तेलंगणासाठी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, हैदराबादच्या 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 'ओल्ड सिटी'तील घोशामहल मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा हिंदुत्ववादी चेहरा समोर केला आहे. हिंदुत्ववादी आणि मराठी मतांचा विचार करत भाजपाने हैदराबादच्या प्रतिष्ठित घोशामहल विधानसभा मतदारसंघातून टायगर राजासिंग यांना उमेदवारी दिली. कट्टर हिंदू समर्थक आणि कट्टर औवेसी विरोधक अशी त्यांची ओळख आहे.
हैदराबादच्या राजकीय रणांगणात घोशामहल मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. शहरातील मध्यवर्ती भागात हा मतदारसंघ असून येथे टी राजा यांचा मोठा प्रभाव आहे. घोशामहलच्या बाजुलाच असलेल्या चारमिनार मतदारसंघातून 2014 च्या विधानसभा निवडणुकांवेळी औवेसींच्या एमआयएमचे सईद पाशा कादरी विजयी झाले होते. त्यामुळे हैदराबादमध्ये औवेसी बंधूंना टक्कर देणारा हिंदू नेता म्हणून टायगर राजा यांची राजधानी हैदराबादसह तेलंगणात ओळख आहे. तसेच, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या औवेसी बंधूंना जशास तसे उत्तर देणारे आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते म्हणूनही टी. राजा यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान, घोशामहल मतदारसंघात टीआरएस आणि एमआयएम यांची युती होण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसच्याही उमेदवाराचे राजासिंग यांना आव्हान असणार आहे. मात्र, गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत राजासिंग यांनी काँग्रेसच्या मुकेश गौड यांचा 46,793 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राजासिंग यांना 92757 मते मिळाली होती. त्यामुळे यंदाही भाजपाने राजासिंग यांचा दबदबा लक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.
मुस्लीम बहुल भागात श्रीरामाची जंगी मिरवणूक
हैदराबादेतील एक कट्टर हिंदू नेता अशी राजासिंग यांची ओळख आहे. श्रीराम युवासेनेचे अध्यक्ष म्हणून राजासिंग हैदराबादमध्ये हिंदूंचे काम करतात. श्रीराम नवमीला हैदराबादमध्ये राजा यांच्याकडून दरवर्षी जंगी मिरवणूक काढण्यात येते. धुलपेठ ते कोटी भागात निघणाऱ्या या मिरवणुकीत अंदाजे 20 लाख लोक सहभागी होतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांप्रमाणेच हिंदू धर्म रक्षणकर्ता म्हणून टायगर राजा यांनाही गणले जाते. राजासिंग हे आरएसएसचे सदस्य असून हिंदू वाहिनी आणि देशातील इतरही हिंदू संघटनांचे ते अनुयायी आहेत.
राजासिंग यांना मराठी फॅन फॉलोइंग
तेलंगणातील भाजपाच्या सर्वात लोकप्रिय आमदारांपैकी टी राजा एक आहेत. इतर आमदारांच्या तुलनेते टी राजा यांची फॅन फॉलोइंग मोठी असून तेलंगणाच्या सीमेलगतच्या महाराष्ट्रातही त्यांचा फॅन फॉलोइंग वर्ग आहे. हैदराबादमध्ये जवळपास 7 लाख मराठीजन आहेत. या मराठी वर्गातही टी राजा यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे.