देश तुमच्या वडिलांची जहागीर आहे का?, चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:46 AM2018-11-29T08:46:30+5:302018-11-29T08:59:09+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या मैदानात चांगलीच कंबर कसून उतरले आहेत.
हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या मैदानात चांगलीच कंबर कसून उतरले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर बोचऱ्या शब्दांत टीका केली जाते आहे. तर सत्ताधारीदेखील त्याच पद्धतीनं विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून वैयक्तिक स्वरुपातील टीका-टिप्पणी सुरूच आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना वादग्रस्त विधान केले आहे.
'भारत देश तुमच्या आजोबा किंवा वडिलांची जहागीर नाही', असे विधान के.चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना केले आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) प्रचारादरम्यान जनतेला संबोधित करताना चंद्रशेखर राव यांनी मोदींवर तिखट शब्दांत हल्लाबोल चढवला.
आपल्या खास शैलीमध्ये राव यांनी मोदींसमोर काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला. भारत तुमच्या आजोबा-वडिलांची जहागीर आहे का?. येथे लोकशाही आहे. तुम्ही किती दिवस सत्तेत राहणार आहात?, असे बोचरे प्रश्न त्यांनी मोदींना विचारले आहेत.
तेलंगणातील आदिवासी आणि मुस्लिमांसाठीचे आरक्षण वाढवून देण्यास परवानगी न दिल्यामुळे चंद्रशेखर राव यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळेस त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाचाही हवाला दिला. 'मी केवळ यासंदर्भातील प्रस्ताव देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. केंद्र सरकारला यापूर्वीही आरक्षणासंबंधी 30 पत्रेही लिहिली आहेत. आमच्या मंत्र्यांनीही दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेऊन प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली होती. आता ते म्हणत आहेत की, ते हा प्रस्तावही मंजूर करणार नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही.'
पुढे ते असंही म्हणाले की, जेव्हा केंद्रात भाजपा-काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची सत्ता येईल, तेव्हाच तेलंगणाला न्याय मिळेल.